Marathi News> मुंबई
Advertisement

दाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे; केंद्र सरकारने एकदाचे ठरवून सांगावे : सचिन सावंत

 मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते

दाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे; केंद्र सरकारने एकदाचे ठरवून सांगावे : सचिन सावंत

 मुंबई :कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतातील प्रिंट तसेच टीव्ही माध्यमातून येत असून यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दाऊद हा भारताचा शत्रु असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. पण २०१४ पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले असून आतापर्यंत सहावेळा दाऊद मरुन जीवंत झाला आहे.

मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा बातम्या आल्या होत्या. आश्र्चर्य म्हणजे या चॅनेल्सची सूत्रे साक्षात आयएसआय पर्यंत पोहोचली आहेत असे ते स्वत:च म्हणतात. मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना 'रॉ'चे एजंट केले तर देशाला फायदा होईल असे सावंत म्हणाले.

देशातील चॅनेलवर हेडलाईन्स काय यावी हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मोदींचे तथाकथित जेम्स बाँड अजित डोवाल ठरवत असतात अशी चर्चा सुरू असते. जेव्हा जेंव्हा मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते हा योगायोग दिसून आला आहे. किंवा भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे विषय चर्चेला घेतले जातात.

दाऊदला फरफटत भारतात आणू अशा वल्गना मोदींसहित भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत केल्या परंतु आजपर्यंत दाऊदला भारतात आणण्यात आलेलं नाही. 

Read More