Marathi News> मुंबई
Advertisement

उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण, तर रामदास कदम यांचा नकार... म्हणाले...

एके काळी शिवसेनेचा वाघ आणि ज्यांच्या भाषणांमुळे मैदान गाजायचं ते शिवसेना नेते रामदास कदम सध्या शिवसेनेवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण, तर रामदास कदम यांचा नकार... म्हणाले...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि त्यापाठोपाठ भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी घेतलेल्या सभांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दोन्ही सभांमधून प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर टीका करण्यात आली होती.

राज ठाकरे ( Raj Thackeray ) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने शनिवार, दिनांक 14 मे रोजी बी.के.सी मैदानावर महाविराट सभा आयोजित केलीय. या सभेसाठी मुंबईतील सर्व शिवसेना पदाधिकारी अफाट मेहनत घेत आहेत. तर, शिवसेनेत नाराज असलेले नेते, पदाधिकारी यांनाही या सभेचं निमंत्रण पाठविण्यात येतंय.

एके काळी शिवसेनेचा वाघ आणि ज्यांच्या भाषणांमुळे मैदान गाजायचं ते शिवसेना नेते रामदास कदम ( Ramdas Kadam ) सध्या शिवसेनेवर नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शनिवारी होणाऱ्या जाहीर सभेचं निमंत्रण रामदास कदम यांना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी पाठवलं आहे.

परंतु, या सभेला पुष्ठीत रहाणार नसल्याचं रामदास कदम यांनी पक्षप्रमुखांना कळवलंय. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राऊत यांना 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं होतं.

त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कदम यांना जाहीर सभेला येण्याचं निमंत्रण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दिलं. अनिल परब प्रकरणापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज होते. त्यामुळे कदम यांना निमंत्रण पाठवून ठाकरे यांनी दिलजमाईचा एक प्रयत्न केल्याचं बोलले जात आहे.

मात्र, रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांचं हे निमंत्रण स्वीकारलेलं नाही. गावात देवळाचा सप्ताह कार्यक्रम असल्यामुळे आपण सभेला उपस्थित राहणार नाही, असे सांगत कदम यांनी या सभेला येण्यास नकार दिलाय.

मी जिवंत असेपर्यत भगव्याची साथ सोडणार नाही. गावातील देवळाचा हा सप्ताह कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे.

ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल :

रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यानंतर कदम यांनीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमैय्या यांना पुरावे दिल्याचा आरोप झाले होते. मात्र, ती ऑडिओ क्लिप फेक असल्याचं सांगत कदम यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं ते पत्र...

कदम शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं.

काय केले होते अनिल परब यांच्यावर आरोप...

माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब हे संजय कदम यांना घेऊन मातोश्रीवर जात होते. अनिल परब मला राजकारणातून संपवण्याचा डाव आखत असल्याचा आरोप कदम यांनी केला होता. 

Read More