Marathi News> मुंबई
Advertisement

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टपासून सुरु होईल. 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून सुरु होईल. या अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यासाठी २० ते २५ जुलैदरम्यान पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी पावसाळी अधिवेशनाबाबत विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. 

१५ दिवस अधिवेशन चालवण्याचा विचार आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली नसेल तर केवळ एक दिवसाचे अधिवेशन बोलावले जाईल. यात फक्त पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याचे कामकाज होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 २२ जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ३ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात पुरवणी मागण्यासांठी आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी एक दिवसाचे विशेष अधिवेशनाची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आपण पाठिंबा दिल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

कोकणामधील 'निसर्ग' चक्रीवादळबाधित व्यक्तींना घरटी दीड लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कपडे आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Read More