Marathi News> मुंबई
Advertisement

Omicron Variant: भारत पुन्हा डेंझर झोनमध्ये, महाराष्ट्रात आढळले नवे 7 रुग्ण

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 17 झाली आहे

Omicron Variant: भारत पुन्हा डेंझर झोनमध्ये, महाराष्ट्रात आढळले नवे 7 रुग्ण

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) देशात चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनची सात नवी प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी मुंबईत (Mumbai) तीन तर पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) चार प्रकरणं आढळली आहेत. यामुळे महाराष्ट्रात ओमायक्रॉनची एकुण 17 प्रकरणं झाली आहेत. 

मुंबईत 3 प्रकरणं
टांझानियामधून धारावीत आलेल्या कोरोना रुग्णाला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता, त्यानंतर त्याला मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

दुसरा रुग्ण 1 डिसेंबरला लंडन इथून आला होता. 25 वर्षीय तरुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तिसरा रुग्ण (गुजरातचा रहिवाशी) हा दक्षिण आफ्रिकेतून 4 डिसेंबरला मुंबईत आला होता. त्याला विमानतळावरुनच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये 4 नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळून आले असून हे चारही जण नायजेरियाहून आले आहेत. यातील तीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत.

गुजरातमध्ये दोन प्रकरणं
गुजरातमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. जामनगरमधील एक महिला आणि तिच्या एका नातेवाईकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना गुरु गोविंद सिंग सरकारी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विशेष ओमिक्रॉन वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. 

देशात आतापर्यंत 32 प्रकरणं

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनची 32 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 17, राजस्थानमध्ये 9, गुजरातमध्ये 3, कर्नाटकात 2 आणि दिल्लीत एकाची पुष्टी झाली आहे.

जगात 59 देशांमध्ये ओमायक्रॉन
24 नोव्हेंबरपर्यंत केवळ दोन देशांमध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली होती. आता 59 देशांणध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. या 59 देशांमध्ये आतापर्यंत Omicron ची 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय, 78,054 संभाव्य प्रकरणे देखील नोंदवली गेली आहेत, ज्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे.

Read More