Marathi News> मुंबई
Advertisement

'भाजपने गोपीचंद पडळकरांना बळीचा बकरा केलेय'

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फायरब्रॅण्ड नेते मानले जातात.

'भाजपने गोपीचंद पडळकरांना बळीचा बकरा केलेय'

मुंबई: वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्यावर सोमवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पडळकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रवेशानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून निवडून आणू, असे वक्तव्य केले. 

या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पडळकर यांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, पडळकर हे संघाचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे यांच्या चेला आहे. सुरुवातीला भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना बारामतीमध्ये उतरवायची तयारी सुरु होती. मात्र, आता भाजपने येथून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करून त्यांना बळीचा बकरा बनवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढाई आणखीनच सोपी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फायरब्रॅण्ड नेते मानले जातात. बारामती मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. २०१९ च्या सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोपीचंद पडळकर याना तीन लाखांहुन अधिक मते मिळाली होती. भाजपाच्या उमेदवारासमोर त्यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे पडळकर यांना उमेदवारी देऊन अजित पवारांना बारामतीमध्येच गुंतवून ठेवण्याची भाजपची खेळी आहे.  

Read More