Marathi News> मुंबई
Advertisement

नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

Navi Mumbai News : नवी मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोहोण्याच्या शिकवणीसाठी गेलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नवी मुंबई : पोहणं शिकण्यासाठी गेलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच विद्यार्थ्यांनी जलतरण तलांवाकडे धाव घेतली आहे. मात्र जलतरण तलावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण नवी मुंबईच्या वाशीत एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या जलतरण तलावातच पोहोण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

वाशीतील फादर ॲग्नेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कॅम्पसमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. मयूर आदिनाथ दमाले (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो फादर ॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होता. मयूर दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. मात्र पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला.

मृत मयूर दमाले हा नेरुळ येथे राहत होता. तो वाशीतील फादर ॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. नुकतीच त्याची अकरावीची परीक्षा झाली होती. त्यामुळे मयूर  फादर ॲग्नेल कॅम्पसमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याच्या शिकवणीसाठी जात होता. शनिवारी दुपारी मयूर स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी मयूरला पोहताना दम लागल्याने तो स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्यानंतर मयूरला तात्काळ बाहेर काढण्यात आले.

बाहेर काढल्यानंतर त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. पण त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली. त्यानंतर वाशी पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Read More