Marathi News> मुंबई
Advertisement

धक्कादायक! मुंबईत लाखो रुपयांना होत होता नवजात मुलीचा सौदा, पोलिसांनी असा केला पर्दाफाश

अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे पोलिसांनी वेषांतर करुन सापळा रचला, मुंबईत रंगला अटकेचा थरार

धक्कादायक! मुंबईत लाखो रुपयांना होत होता नवजात मुलीचा सौदा, पोलिसांनी असा केला पर्दाफाश

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : अवघ्या 15 दिवसांच्या नवजात मुलीचा सौदा करण्याचा डाव मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. वरळी इथे राहणारी ज्युलिआ फर्नांडिस आणि गोवंडीमधल्या शिवाजी नगर इथे राहाणारी शबाना शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावं आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?
मुंबईतील एक महिला नवजात मुलीसाठी खरेदीदार शोधत असल्याची माहिती केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरचे सदस्य असलेल्या जयप्रकाश जाधव यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक महिला आणि बालकल्याण प्राधिकरणाला आणि मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मुंबई पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला. तक्रारदार जाधव यांना आरोपी महिलेशी संपर्क साधण्यास पोलिसांनी सांगितलं.  त्यानुसार जयप्रकाश जाधव यांनी महिलेशी संपर्क साधत बाळ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर आरोपी महिलांनी साडेचार लाख रुपयांची मागणी केली. 

जयप्रकाश जाधव यांनी पैसे देण्याची तयारी दाखवल्यावर आरोपी महिलेने जाधव यांना सायन कोळीवाडा इथल्या अहाना नर्सिंग होम इथं भेटण्यास बोलावलं. ठरल्याप्रमाणे जाधव रविवारी नर्सिंगहोममध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर एक महिला पोलीस आण एक कॉन्स्टेबल वेषांतर करुन पती-पत्नी म्हणून सोबत आले

आरोपी महिला शबाना शेख आणि ज्युलिआ फर्नांडिस नवजात मुलीला घेऊन नर्सिंग होममध्ये घेऊन आली. जयप्रकाश जाधव यांनी बाळाच्या बदल्यात पैसे देण्याची तयारी दाखवली. पैशांची देवाण घेवाण सुरु असतानाच वेषांतर करुन आलेल्या पोलिसांनी दोन महिलांना रंगेहाथ अटक केली.

नर्सिंग होमच्या भूमिकेबद्दल देखील पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही आरोपी महिलांवर मानवी तस्करी आणि बाल न्याय आणि संरक्षण कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्युलिया फर्नांडिस हिच्यावर मानवी तस्करीच्या अनेक प्रकरणांची मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे. या महिलांनी आणखी किती जणांना अश्या प्रकारे मुले विक्री केली आहेत का? आणि बालके चोरली आहेत का याचा तपास मुंबई पोलीस करत आहे.

Read More