Marathi News> मुंबई
Advertisement

Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

Water Cut : मुंबईतल्या काही भागांमध्ये सलग 10 शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा अशी सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच रविवारी येणारे पाणी गाळून आणि उकळून घेण्यासह अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) पूर्व उपनगरातील ‘एल’ विभागामधील (L Ward) खैरानी रोडखाली (khairani road) असणाऱ्या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी 10 दिवसांचा कालवधी लागणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र सलग 10 दिवस पाणीपुरवठा (Water Cut) बंद ठेवल्याने नागरिकांची मोठी गैरसोई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम टप्प्या टप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलग 10 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होणार असल्याने महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने याबाबत सकारात्मक विचार करुन सदर काम हे टप्प्या-टप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने हे काम टप्प्या-टप्प्याने सलग 10 शनिवारी करण्यात येणार आहे. यामुळे शनिवार, दि. 4 मार्च 2023 ते शनिवार, दि. 6 मे 2023 या कालावधीदरम्यान प्रत्येक शनिवारी ‘एल’ विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच खबरदारीची उपाय म्हणून दर रविवारी येणारे पाणी गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.

नेमकं कारण काय?

‘एल’ विभागातील खैरानी रोडखाली असणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या व 800 मीटर लांबीच्या जल वाहिनीचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जल वाहिनीमध्ये‘क्युअर्ड इन प्लेस्ड पाईप’ (cured in placed pipe) या पद्धतीने मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम टप्प्या-टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. येणाऱ्या शनिवार पासून 6 मे 2023 च्या प्रत्येक शनिवारी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरांमध्ये  सलग 10 शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी, म्हणजेच दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. तसेच पाणी जपून व काटकसरीने वापरावे.

Read More