Marathi News> मुंबई
Advertisement

शिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश

Mumbai Crime News : शिवडीत 12 दिवसांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण देखील समोर आलं आहे.

शिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश

Mumbai Crime : मुंबईच्या शिवडी इथल्या बीपीसीएलच्या मागे असलेल्या झुडपाच एका 40 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह सापडल्यानंतर सुमारे बारा दिवसांनी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. शिवडी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला शुक्रवारी अटक केली. डोक्यात प्रहार करून महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघड होताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सखोल तपासानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. सपना बातम (40) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून शहजादा उर्फ रमजान रफी शेख (37, रा. वडाळा पूर्व) असे आरोपीचे नाव आहे.

22 जानेवारीला शिवडीतील टिकटॉक पाईन्टजवळील बीपीसीएल कंपनीचे पाठीमागच्या झुडपामध्ये सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला. डोक्यात प्रहार करुन हत्या केल्याचे कळताच पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृतदेहाचा चेहराही ओळखता येत नसल्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटविणे कठीण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वडाळा, यलोगेट पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची एकूण आठ पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला 162 हरवलेल्या महिलांची माहिती तपासली. त्यानंतर पोलिसांनी 200 महिलांकडे चौकशी केली असता मृत महिला मुंबई सेंट्रल परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपी शेहजादा याने तिला दारू पाजण्याच्या बहाण्याने टिकटॉक पाईन्टजवळी नेले. तिथे दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर शेहजादाने सपनाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. तसेच ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचला. त्यानंतर शेहजादाने सपनाचा मृतदेह प्लास्टिकने झाकून त्यावर लाकडी फळ्या टाकल्या.

मुंबई सेंट्रल परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या दोनशेहून अधिक महिलांची चौकशी दरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या सपनाच्या बांगड्यांच्या मदतीने तिची ओळख पटली. तिच्या मुलीनेही तिला ओळखले होते. चौकशीत मुलीने शेख याच्याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांना शेखवर संशय व्यक्त होता कारण त्याच्यावर सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी याआधी मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला होता.

का केली हत्या?

आरोपीने तिच्या मुलीशी लग्न न लावून दिल्याचा बदला घेण्यासाठी सपनाची हत्या केली. सपनाच्या मुलीवर आरोपीचे प्रेम होते. शेखने यापूर्वी सपनाच्या मुलीशी गैरवर्तन केल्यानंतर तिने आरोपीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता, ज्यासाठी त्याला तीन वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले होते. जेव्हा तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याला कळलं सपनाने तिच्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. यामुळे तो आणखी चिडला आणि त्याने सपानाला मारण्याचा निर्णय घेतला.

Read More