Marathi News> मुंबई
Advertisement

ड्रग्ज घ्यायला पैसे नसल्याने दाम्पत्याचा टोकाचा निर्णय, 'पोटच्या मुलांनाच...'

Mumbai Crime: अंधेरीतील या दाम्पत्याने पैशांसाठी स्वतःच्या दोन मुलांना विकले. ही बाब इतरांना समजताच सर्वांना धक्का बसला. 

ड्रग्ज घ्यायला पैसे नसल्याने दाम्पत्याचा टोकाचा निर्णय, 'पोटच्या मुलांनाच...'

Mumbai Crime: कोणत्याही पदार्थाचे व्यसन हे माणसाला आयुष्यातून उठवते. अमली पदार्थांचे व्यसन तर खूपच घातक असते. याच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना आपण काय करतो आहोत? याचे भान नसते. मुंबईतल्या अंधेरीत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्जसाठी पैसे नसल्यामुळे पती-पत्नीने आपल्याच मुलाला विकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी कडक कारवाई केली. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने 4 जणांना ताब्यात घेतले असून पोलीस सखोल चौकशी सुरू केली आहे. काय आहे हे? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

मुंबईतील अंधेरी भागात एका दाम्पत्याने आई-वडिल आणि मुलांच्या नात्याला काळीमा फासला आहे. हे दाम्पत्य अमली पदार्थांच्या व्यसनात अडकले होते. त्यांचे हे व्यसन इतके वाढले होते की खर्चासाठी त्यांना पैसे नव्हते. अशावेळी काय करायचे हा विचार करत असताना खूप वाईट विचार त्यांच्या मनात आला. कोणतेच आई-वडिल धजावणार नाहीत असा निर्णय त्यांनी घेतला.

अंधेरीतील या दाम्पत्याने पैशांसाठी स्वतःच्या दोन मुलांना विकले. ही बाब इतरांना समजताच सर्वांना धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दाम्पत्याने मुलाला 60 हजार रुपयांना तर एका महिन्याच्या मुलीला 14 हजार रुपयांना विकले.

पोलिसांनी शब्बीर खान, त्याची पत्नी सानिया, उषा राठोड आणि शकील मक्राणी यांच्याविरुद्ध अमली पदार्थांसाठी मुलांना विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शब्बीर आणि सानिया ड्रग्सच्या अधीन गेले होते, ते ड्रग्जशिवाय राहू शकत नव्हते. त्याचवेळी आरोपी महिला राठोड त्याच्या संपर्कात आली, तिने खान दाम्पत्याला आपला पहिला मुलगा विकायला लावला आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा हुसेन आणि एक महिना 22 दिवसांची मुलगी विकली. ज्या व्यक्तीला ही विक्री करण्यात आली त्याची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

आरोपीच्या बहिणीने दिली तक्रार

आरोपी शब्बीरची बहीण रुबिना खानला हा प्रकार समजल्यावर तिला धक्काच बसला. तिला आपल्या भावाचा प्रचंड राग आला. यानंतर तिने तात्काळ डीएन नगर पोलीस ठाणे गाठले. भाऊ आणि मेहुण्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Read More