Marathi News> मुंबई
Advertisement

नकली नोटांचं फसवं मायाजाल, नोटांना भुलाल तर रिकामे व्हाल, पाहा Special Reort

नकली नोटांच्या धंद्यातील एका मोठ्या गँगचा पर्दाफाश, गँगची मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल थक्क

नकली नोटांचं फसवं मायाजाल, नोटांना भुलाल तर रिकामे व्हाल, पाहा Special Reort
Updated: Nov 08, 2022, 11:34 PM IST

यशा कोटक, झी मीडिया, मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नकली नोटांच्या (Bogus Currency) धंद्यातील एका मोठ्या गँगचा पर्दाफाश केलाय. या गँगनं आजवर अनेक व्यापा-यांना लाखोंचा गंडा घातलाय. या गँगची मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) पाहाल तर तुम्हीही थक्क व्हाल. ही गँग मोठ्या व्यापाऱ्यांना फोन करून आपण इन्कम टॅक्स ऑफिसर (Income Tax Officer) असल्याची बतावणी करायची. आपल्याकडे छाप्यातील लाखो, करोडो असून हे पैसे मार्केटमध्ये आणणं शक्य नाही असं सांगितलं जायचं. 

व्यापाऱ्यांनी पैसे एक्स्चेंज केल्यास त्यांना मोठा मोबदला दिला जाईल असं आमिष दाखवलं जायचं. व्यापारी प्रत्यक्ष भेटीसाठी आल्यानंतर त्यांच्यासाठी आलिशान गाडी पाठवली जायची. बड्या हॉटेलात बसून सौदा पक्का केला जायचा मात्र एक्स्चेंजवेळी व्यापाऱ्याच्या हातात पडायच्या नकली नोटा. लहान मुलांच्या खेळातल्या नोटा. रामदास बल्लाळ या व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रवीकांत हिवराळे, योगेश हिवराळे आणि आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्यायेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपीची पत्नी एका गावात सरपंच आहे. पोलिसांनी या आरोपींकडून फॉर्च्युनर (Toyota Fortuner) गाडी जप्त केलीय. आता या गँगनं आणखी किती व्यापाऱ्यांना असा गंडा घातलाय याचा पोलीस शोध घेतायेत.