Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईतली महाविद्यालयं बंदच राहणार

अकरावीच्या ऍडमिशन्ससाठी पुन्हा एकदा मुदतवाढ 

मुंबईतली महाविद्यालयं बंदच राहणार

मुंबई : मुंबईतली महाविद्यालयं (Mumbai College Closed)  तूर्तास बंदच राहणार आहेत. कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर भागातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातली महाविद्यालयं सोमवारपासून सुरू होत असली तरी मुंबईतली महाविद्यालयं बंद राहणार आहेत. मुंबई पालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने राज्यातील इतर अनेक भागातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालये बंदच राहणार आहेत. 

अकरावीच्या ऍडमिशन्ससाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अपरिहार्य कारणामुळे ज्यांना प्रवेश घेता आले नसतील त्यांच्यासाठी ही मुदतवाढ आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र ही अखेरची संधी असणार आहे. यानंतर अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार नाही. 

 मुंबईतील विद्यार्थ्यांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत याबाबतचा निर्णय होणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या सूत्रांकडून समजते. यामुळे तूर्तास शहरातील कॉलेजे व शाळा बंदच राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने योग्य ती काळजी घेत कॉलेजे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र राज्यातील करोनाची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कॉलेजे सुरू करण्याचा निर्णय घेतला नव्हता.

आता राज्यातील शाळा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत असून, प्रथम नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर चौथी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, राज्यातील कॉलेजे सुरू करण्याबाबत राज्य सरकारने विचार सुरू केला होता. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून कॉलेजे सुरू करण्याचे निर्देश सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठाना दिले होते. मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनांची परवानगी घेणे आवश्यक होते. 

Read More