Marathi News> मुंबई
Advertisement

लालबागमधील मानाचा गणपती बसवणाऱ्या मंडळाचा मोठा निर्णय

गणेश गल्लीतील बाप्पाची मूर्ती ही मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक असते. 

लालबागमधील मानाचा गणपती बसवणाऱ्या मंडळाचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईचा राजा आणि लालबागमधील मानाचा गणपती असणाऱ्या गणेश गल्लीच्या मूर्तीची उंची यंदा कमी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा कृत्रिम तलावात विसर्जित होईल एवढ्याच उंचीची मूर्ती बनवण्यात येईल. ही मूर्ती शाडूची असेल. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्याकरता लाईव्ह दर्शनाची व्यवस्थाही मंडळाच्यावतीने करण्याचा मानस आहे. 

'परळचा राजा' गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय; यंदा २३ फुटांऐवजी फक्त तीन फुटांची मूर्ती

गणेश गल्लीतील बाप्पाची मूर्ती ही मुंबईतील सर्वात उंच गणेशमूर्तींपैकी एक असते. याशिवाय, भव्यदिव्य  देखावे आणि सजावटीमुळे हा गणपती पाहण्यासाठी लोक मोठ्याप्रमाणावर गर्दी करतात. मुंबईचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे भाविकांना या सगळ्याला मुकावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणेश मंडळांना यंदाचा उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते. होळीनंतर राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. यानंतर सर्वधर्मीयांनी सरकारला सहकार्य केले आहे. आपण वारी सुरक्षित पार पाडतोय. तसाच गणेशोत्सवही सुरक्षेचे भान राखून साजरा झाला पाहिजे. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या राहतील. त्यामुळे सुरक्षित उत्सव साजरा होणे गरजेचे आहे.  त्यामुळे गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणेकरून सुरक्षेचे अनेक प्रश्न सुटतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. 

Read More