Marathi News> मुंबई
Advertisement

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी फरार, 24 तासानंतरही मिहीर शाह मोकाट

Worli Hit and Run Case : मुंबईतल्या वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह अजूनही मोकाटच आहे. दुर्घटना होऊन दीड दिवस उलटला तरी मिहीर शाह अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी फरार, 24 तासानंतरही मिहीर शाह मोकाट

Worli Hit and Run Case : वरळीतील हिट अँड रन प्रकरणातला प्रमुख आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मिहीर हा पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. दारुच्या नशेत भरधाव BMW कार चालवणाऱ्या मिहीरनं रविवारी सकाळी वरळीत एका दुचाकीला उडवलं अपघातात जखमी नाखवा दाम्पत्याला मदत करण्याऐवजी त्यानं कारखाली सापडलेल्या महिलेला फरफटत नेलं. त्यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Worli Hit and Run)

याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना तातडीनं अटक करण्यात आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे 24 तास उलटले तरी आरोपी मिहीर शाह पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अजूनही तो फरार आहे.. त्याच्याविरोधात पोलिसांनी लुक आउट नोटीस (Look out Notice) जारी केलीय. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश सापडू नये, यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय. सत्ताधारी पक्षाचा नेता आणि त्याचा मुलगा या प्रकरणात आरोपी आहेत. त्यावरून दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला..

विरोधी पक्षांचा हल्लाबोल
वरळी हिट अँड रनमधील आरोपी अद्यापही फरार आहे. अजूनही आरोपी का पकडला गेला नाही, असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिर अहिर यांनी राज्य सरकारला विचारलाय. आरोपी जर लवकर पकडला गेला नाहीतर नमुने मिळणं अवघड होईल, त्यामुळे लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्यावं, असं त्यांनी म्हटलंय.  सरकारची तगडी यंत्रणा असूनही आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेबाबत सरकारला गांभीर्य नाही, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. तर आपल्या नेत्याला वाचवत असाल तर हा कायद्याशी अपराध आहे, असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधलाय. या घटनेवर सरकारला उत्तर द्यावं लागेल. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही, असं त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश
दरम्यान, हिट अँड रनच्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. काही धनदांडगे, राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत, प्रभावशाली, लोकप्रतिनिधींची मुलं तसेच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी खास ट्विट करून स्पष्ट केलंय..

कायदा सामान्यांसाठी आणि धनदांडग्यांसाठी सारखाच आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.  मात्र जोपर्यंत पोलीस मिहीर शाहाच्या मुसक्या आवळत नाहीत, तोपर्यंत सरकारच्या या दाव्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.. 

Read More