Marathi News> मुंबई
Advertisement

भाजपचे 'मनसे' अभिनंदन तर शिवसेनेवर बोचरी टीका, महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा मोठा धक्का बसला. 

भाजपचे 'मनसे' अभिनंदन तर शिवसेनेवर बोचरी टीका, महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत काय होतंय याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले होते. काल दिवसभर आणि अगदी पहाटेपर्यंत या निवडणुकीसाठीचा हाय वोल्टेज ड्रामा सुरू होता.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिवसेनेला पराभवाचा मोठा धक्का बसला. कारण शिवसेनेचे उमेदवार संजय पवार ( Sanjay Pawar )  पराभूत झाले आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) विजयी झाले. महाविकास आघाडीची 10 मते फुटली. 

शिवसेनेच्या या पराभवाची संधी साधत मनसेने पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे  ( Sandip Deshpande ) यांनी शिवसेना उमेदवाराच्या पराभवामुळे महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम कोण आहे हे शिवसेनेने सिद्ध केले आहे. बोरू बहाद्दर आणि कारकुनावर विश्वास ठेवला की कप्तान कसा तोंडावर आपटतो हे या निवडणुकीतून समोर आले, अशी बोचरी टीका केलीय.

स्वतःला महाविकास आघाडीचे चाणक्य समजणारे आणि आमचे नगरसेवक पळवणारे काळा जामुनचा रस निघाला आहे. पार चोथा झाला आहे. शिवसेनेत हिम्मत असेल तर येणारी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी. 

ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी कारभार केला आहे त्यावर जनता नाराज होतीच. आता आमदारही नाराज आहेत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीची मत फुटली आहेत. आम्ही या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे या विजयात आमचा ही वाटा आहे असे पुढे संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. 

मनसे आमदार राजू पाटील ( MNS MLA RAJU PATIL ) यांनीही ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांचे मनसे अभिनंदन केले आहे. औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली, अशी टीका आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून केलीय.

राष्ट्रवादीसमोर लाचारी पत्करून आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणाऱ्या त्या  निजामाच्या औलादीची मदत घेवून ही सेना तोंडावर आपटली. तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले. विश्व प्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला अशी टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे ( GAJANAN KALE ) यांनी केली आहे.

Read More