Marathi News> मुंबई
Advertisement

म्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक

म्हाडाचे घर मुंबईत असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर मिळवून देण्याच्या नावे, फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे.  

म्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक

मुंबई : म्हाडाचे घर मुंबईत असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर मिळवून देण्याच्या नावे, फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाने सावधनतेचा इशारा दिला आहे. तुम्हाला म्हाडाचे घर हवे असल्यास पेटीएमवर अथवा पोस्टाच्या या खात्यावर पैसे पाठवा, असे सांगून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हाडाच्यावतीने अशा प्रकारे कुठल्याही स्वरुपाची पैशाचे व्यवहार केले जात नाहीत.  तसेच म्हाडाने या कामाकरिता कुठल्याही प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. 

म्हाडाच्या नावे काही मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. ही बाब म्हाडा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर म्हाडाकडून खुलासा करण्यात आला आहे. समाजमाध्यमातून दादर परिसरात म्हाडाची घरे विक्रीस उपलब्ध असल्याची बतावणी करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. या संदेशासोबतच काही लोकांना थेट संपर्क करुन देखील अशा पध्दतीने म्हाडाची घरे विकत असल्याचा बनाव केला जातो व त्याकरीता  या व्यक्ती "पेटीएम " वरून अथवा "कॉर्पोरेट सेंट्रल कलेक्टिव हब म्हाडा"  या नावाने इंडियन पोस्ट बँकेच्या खात्यावर पैसे मागवीत आहेत. मात्र, असे म्हाडाकडून सांगण्यात आलेले नाही. किंवा म्हाडा अशी पैशाची मागणी करत नाही, असे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिका या जाहीर संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे वितरित केल्या जातात. त्याकरीता विक्रीस उपलब्ध असलेल्या सदनिकांची जाहिरात नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध करण्यात येते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदनिका विक्रीचे अर्ज नागरिकांकडून मागविले जातात आणि अर्जाची रक्कम आणि अनामत रक्कम म्हाडाने जाहिरातीत नमूद बँकेतच जमा केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येते, असे म्हाडाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहा, असे आवाहन म्हाडाने केले आहे.   

म्हाडाने कोणताही प्रतिनिधी नेमलेला नाही. त्यामुळे अशा मेसेच किंवा म्हाडाचा प्रतिनिधी असल्याचे कोणी सांगत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये.  तसेच पैशाचे व्यवहार करु नये, असे आवाहन म्हाडाने एका प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.  नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभाग घ्यावा. म्हाडाच्या सदनिकांचे वितरण हे केवळ संगणकीय सोडत प्रणालीच्याच माध्यमातून करण्यात येत असते. भविष्यातही हीच कार्यप्रणाली कार्यरत राहणार असून याकरिता कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केलेय. 
     
दरम्यान, तुमची अशाप्रकारे फसवणूक होत असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागास पुढील पत्त्यावर कळवावी. मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, गृहनिर्माण भवन, चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व, मुंबई -५१. दूरध्वनी क्रमांक - ०२२-६६४०५४४५, ०२२-६६४०५४४६, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी कळविले आहे. 

Read More