Marathi News> मुंबई
Advertisement

एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग पसरली आहे.

एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रुग्णालयात दाखल

मुंबई: मुंबईच्या वांद्रे परिसरात सोमवारी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही नऊ मजल्यांची इमारत आहे. त्यापैकी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग पसरली आहे. त्यामुळे एमटीएनलचे तब्बल १०० कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर अडकून पडले आहेत. 

दुपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशम दलाकडून ही चौथ्या दर्जाची (लेव्हल ४) आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील अग्निशमन केंद्रांवरील गाड्याही याठिकाणी दाखल झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाचे अनेक ज्येष्ठ अधिकारी घटनास्थळी बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. 

आग लागल्यानंतर याठिकाणी काही वेळातच धुराचे लोट संपूर्ण इमारतीमध्ये पसरले. त्यामुळे हे कर्मचारी इमारतीमधून बाहेर पडू शकले नाहीत. आगीपासून वाचण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी गच्चीवर धाव घेतली. या इमारतीमध्ये लाकूड आणि केबल्सचा मोठा साठा असल्याने आग आणखी वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गच्चीवर अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. 

सध्या ते याठिकाणी उभे राहून मदतीसाठी याचना करत आहेत. त्यामुळे आता अग्निशमन दलासमोर या कर्मचाऱ्यांना सुखरुप खाली आणण्याचे आव्हान आहे.

तसेच इमारतीच्या वरच्या भागात सॉकेटसचा मोठा साठा असल्याने आग आणखी भडकण्याचा धोका आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी स्नॉर्केलच्या (शिडी) सहाय्याने गच्चीवरील कर्मचाऱ्यांना वेगाने खाली उतरवायला सुरुवात केली आहे.

हे काम आणखी वेगाने करण्यासाठी आणखी स्नॉर्केल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत साधारण ७० कर्मचाऱ्यांना स्नॉर्केलच्या सहाय्याने सुखरुपपणे खाली उतरवण्यात आल्याचे समजते. 

Read More