Marathi News> मुंबई
Advertisement

निवडणूक लढविताना उमेदवारांना उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार

 निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे.

निवडणूक लढविताना उमेदवारांना उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या शपथपत्रात महत्वाचे बदलकेले आहेत. यापुढे उमेदवाराला पत्नी आणि अवलंबितांसह मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागणार आहे. याआधी फक्त मत्ता (assets) आणि दायित्व (liabilities) याची माहिती विचारली जात होती. आता उत्पन्नाचा स्रोत, आयकर रिटर्न भरणा, पॅन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहून निवडणूक लढवण्याची हौस भागवून घेणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जामध्ये त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सांगावा लागणार आहे. त्यामुळे अन्य मार्गाने संपत्ती कमावून नंतर राजकारणात येणाऱ्यांना चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारांच्या शपथपत्रात आता उत्पन्नाचा स्रोत, आयकर रिटर्न भरणा, पॅन कार्डची माहिती, द्यावी लागणारी शेती, नोकरी, व्यापार / व्यवसाय, गाळे - इमारतीच्या भाड्यातून मिळणारे उत्पन्न अशा सर्व उत्पन्न स्त्रोतांची विस्तृत माहिती द्यावी लागणार आहे. यामुळे उमेद्वाराचा उत्पन्नाचा स्रोत आणि निवडून आल्यानंतर वाढ झालेल्या संपत्तीचा अंदाज यापुढे मतदारांना बांधता येईल.. 

उमेदवारांची शैक्षणिक अर्हता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीसोबत आता  उत्पन्नाचा स्रोत देणं बंधनकारक असल्याने अवैध पद्धतीने पैसा कमावणाऱ्या व्यक्तींना चाप बसेल. नवीन नमुना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी लागू होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला वाशीम येथिल जिल्हा परिषद निवडणुका आणि धुळे, अहमदनगर महापालिका निवडणुकीत प्रथमंच नवीन उमेदवारी अर्जाचा नमुना देण्यात येणार आहे.

Read More