Marathi News> मुंबई
Advertisement

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

सीमा आढे, झी मीडिया, मुंबई  : लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याचाच धडा घेत आता अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेसाठी (Assemly Election) जोरदार तयारी सुरु केलीय. विधानसभेआधी अजित पवार अॅक्शन मोडवर आलेत. विधानसभेसाठी अजित पवारांची तसंच पक्षाची ब्रँडिंग आणि रणनीती तयार करण्यात आलीय. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अजित पवारांनी 90 दिवसांचा प्लॅन तयार केलाय. विधानसभेचं रणशिंग फुंकण्याआधी अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले. अजित पवार, सुनील तटकरेंसह मंत्री आणि आमदार सिद्धिविनायक चरणी नतमस्तक झाले. येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जय्यत तयारी सुरु केलीय. त्याआधी सिद्धिविनायकाच्या चरणी नारळ फोडण्यात आला..

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅपसुद्धा ठरलाय. बारामतीमधून विधानसभेचं रणशिंग फुकलं जाणार आहे. येत्या 14 जुलै रोजी बारामतीमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातही जनसन्मान सभांचं आयोजन केलं जाणार आहे. अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचं कॅम्पेन राबवलं जाणारेय.

विधानसभेसाठी 'दादा' प्लॅन 
अजित पवारांचं ब्रँडिंग.. 'शब्दाला पक्का, अजिदादा' कॅम्पेन. विरोधकांना आपल्या नॅरेटिव्हवर आणा, आपला नॅरेटिव्ह सेट करा, बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या घोषणांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करा, पुढच्या 90 दिवसात विधानसभा निवडणुकीचा प्लॅन राबवला जाणार. प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार

अजित पवार घाबरलेत म्हणून त्यांना मंदिर आठवत असल्याची टीका त्यांचे पुतणे रोहित पवारांनी केलीय. 200 कोटी रूपये खर्चून एक पीआर कन्सलटन्सी अजितदादांनी मदतीला घेतलीय. त्यामुळं ते सांगतील तसं दादा करतायत. कपडे काय घालायचे,काय बोलायचे...त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते मंदिरात गेलेत. आतापर्यंत त्यांनी कधी हे केले नाही. पण भाजपच्या संगतीला गेल्याने ते हे करू लागले असतील. परंतु याचा काहीही उपयोग विधानसभा निवडणुकीत होणार नाही अशी टीका रोहित पवार यांनी केलीय. 

तर सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं, पुण्य कोण करतंय पाप कोण करतय, चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतोय हे त्यांना कळत असतं. ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे,  सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीने दादा प्लॅन तर बनवलाय. सिद्धिविनायकाच्या चरणी प्रचाराचा नारळही फोडण्यात आलाय. आता बाप्पा अजित पवारांना पावणार का हे येणाऱ्या निवडणुकीतच समजणार आहे.

Read More