Marathi News> मुंबई
Advertisement

'फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि...' चिन्मय मांडलेकरला मनसेचा पाठिंबा

MNS on Chinmay Mandlekar : मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या मुलाचं नाव जहांगीर असे ठेवल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने चिन्मयला पाठिंबा दर्शवला आहे. 

'फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि...' चिन्मय मांडलेकरला मनसेचा पाठिंबा

Chinmay Mandlekar : लोकप्रिय मराठी अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावाने ट्रोल केलं जात आहे. चिन्मयने आपल्या मुलाचा नाव 'जहांगीर' (Jahangir) ठेवलं आहे.  यावरुन सोशल मीडियावर चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकरवर (Neja Joshi Mandlekar) खालच्या पातळीवर ट्रोल करण्याय येतंय.  चिन्मय मांडलेकर आणि नेहा मांडलेकर या दोघांनीही मुलाचे नाव जहांगीर का ठेवले, याबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. पण पुन्हा एकदा हा मु्द्दा बाहेर काढण्यात आला आहे. यावर नेहा मांडेलकरने एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सला उत्तरही दिलंय. 

नेहा मांडलेकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर चिन्मय मांडलेकरसह (Chinmay Mandlekar) मनवा नाईक, गौतमी देशपांडे या कलाकारांनी लाईक केला आहे. तसेच अनेक चाहतेही लाईक्स करत नेहाला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता चिन्मय आणि नेहा मांडलेकरला मनसे चित्रपट कर्मचारी सेनेनेही पाठिंबा दिला आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 

मनसेचा चिन्मय मांडेलकरला पाठिंबा
अभिनेता चिन्मय मांडलेकरचा व्हिडिओ पाहिला. मुलांच नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला सोशल मीडियावर एक विशिष्ट वर्ग ट्रोल करत आहे, आणि ही गोष्ट मनाला लावून घेत चिन्मयने या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असं जाहीर केलं आहे. पण खरंतर ही आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे. त्याचा मुलगा 11 वर्षांचा आहे, पण त्यावरून चिन्मयला आताच का ट्रोल केलं जावं? गेली 11 वर्ष कुठे होते हे ट्रोलर्स? खरं तर चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव काय ठेवावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, यात बोलणारे हे ट्रोलर्स कोण? 

जेव्हापासून समाजाची मक्तेदारी घेतलेल्या ह्या बावळट ट्रोलर्सचा सोशल मीडियावर सुळसुळाट झाला आहे, त्याचा नाहक त्रास इमाने-इतबारे काम करणाऱ्या अनेकांना होत आहे. या आधीही देशात अनेक मोठे कर्तृत्ववान व्यक्ती जहांगीर नावाने होऊन गेले आहेत. फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पण्या करून त्रास द्यायचा. हे काही बरे नाही.

मी स्वतः आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना आम्ही चिन्मयच्या बाजूने ठाम उभे आहोत. मी चिन्मयला विनंती करेन की सोशल मीडियावरच्या ह्या बावळट-बिनडोक ट्रोलर्सचं मनावर न घेता. तू तुझं हवं असलेलं काम, अविरत सुरू ठेवावं! असं शालिनी ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

चिन्मयने घेतला मोठा निर्णय
मुलाच्या नावाने ट्रोल केलं जात असल्याने चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न साकारण्याच्या निर्णय घेतला आहे. चिन्मय म्हणाला की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्या मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला. माझा मुलगा हा फक्त 11 वर्षांचा आहे आणि त्याला तर यागोष्टीची समजदेखील नाही. पण हे सगळं आम्ही कसं काय सहन करु शकतो? मी या आधी देखील मुलाखतीत अनेकदा बोललो आहे, मग आताच का अशा प्रकारची ट्रोलिंग होतेय? खरंतर अशा प्रकारच्या ट्रोलिंगवर कायदा आणायला हवा. सोशल मीडिया सुरु झाल्यापासून ट्रोलर्स ही जणूकाही समाजाला लागलेली एक कीड आहे. कोणी यांना थांबवू शकत नाही, त्यामुळे इतरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. छत्रपती शिवरायांची माफी मागून फक्त माझ्या कुटुंबाच्या काळजीसाठी मी या भूमिकेतून रजा घेतोय. 

Read More