Marathi News> मुंबई
Advertisement

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?

Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.

भाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?
Updated: Jun 05, 2024, 03:36 PM IST

Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपच्या (BJP) पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्त्वाकडे करणार आहे. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं पक्षासाठी संपूर्ण वेळ देणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. 

'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत? 
महाराष्ट्रात एनडीएला 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. 2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यानी कमी जागा मिळाल्याचं कारण सांगितलं. 'आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आहेत. आमची लढाई महाविकास आघाडीच्या पक्षांशी होती. तशी नरेटीव्हबरोबर लढाई सुद्धा होती. संविधान बदलण्याचा नरेटीव्ह तयार केलेला तो थांबवण्यात आम्हाला यश आलं नाही असं फडणवीस यांनी सांगितलं.

'पराभवाला जबाबदार मीच'
महाराष्ट्रात जागा कमी आल्यात हे फॅक्ट आहे. राज्यात निवडणुकीचं नेतृत्व भाजपामध्ये मी करत आहे. जो पराभव झाला, ज्या जागा कमी झाल्या त्याची जबाबदारी माझी आहे. मी हे मान्य करतो की मी कुठेतरी यामध्ये स्वत: कमी पडलो आहे. मी ती कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करणार. भाजपाला महाराष्ट्रात जो काही सेटबॅक सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे," असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

महायुतीला राज्यात किती जागा
2019 लोकसभा निवडणुकीत महायुतीला 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप-शिवसेनबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही युती केली. युतीने यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण यावेळी त्यांना फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे.