Marathi News> मुंबई
Advertisement

Maharashtra Covid Update: धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत

Maharashtra Covid Update: मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे.

Maharashtra Covid Update: धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत

Maharashtra Covid Update: महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. मंगळवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी कोरोनाची 11 प्रकरणं समोर आल्याने चिंता वाढली आहे. मुख्य म्हणजे यामधील सर्वाधिक रूग्ण हे राजधानी मुंबईत आहेत. या नव्या रूग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाचे एकूण 35 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे. होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे. या रूग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.

हेल्थ बुलेटीननुसार, मंगळवारी एकाही रूग्णाला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाने 80,23,407 रूग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे मंगळवारी एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

भारतात कोविड-19 चे सब-व्हेरियंट JN.1 चे पहिलं प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवण्यात आलं होतं. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये होतं. देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिलं प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्यास सांगितलं.

केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, "केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि कामामुळे आम्ही कोरोना-19 प्रकरणांची आकडेवारी कमी करू शकलो. कोविड-19 विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी गती राखणं महत्त्वाचं आहे.

पंत यांनी असंही म्हटलंय की, केरळसारख्या काही राज्यांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. कोविड सब-व्हेरियंट JN.1 चे पहिलं प्रकरण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवलं गेलंय. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.

Read More