Marathi News> मुंबई
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Monsoon Session Live : 'देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी मानत असतील तर...'; संभाजी भिडे प्रकरणात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Monsoon Session 2023 Live : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचे कामकाज सुरु झाले आहे. विरोधक संभाजी भिंडेच्या वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Monsoon Session Live : 'देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी मानत असतील तर...'; संभाजी भिडे प्रकरणात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
LIVE Blog

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विधिमंडळ अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु होत आहे. काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्याची आज अधिकृत निवड होण्याची शक्यता आहे. यासोबत संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य आणि समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात यामुद्दांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

02 August 2023
17:52 PM

शरद पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घ्यायला हवे - उद्धव ठाकरे

कालच्या शरद पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि दोन तीन उदाहरणे दिली त्याच्यावरही लक्ष दिले पाहिजे. बैठकीमध्ये सगळे काय बोलतात ते पाहू. सप्टेंबरमध्ये देशपातळीवरील विरोधकांची बैठक होणार आहे. समृद्धी महामार्गावर अपघात कसा झाला याची माहिती घेतली तर ती फार भयानक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

17:44 PM

गुरुजींनी चांगले धडे विद्यार्थ्यांना द्यावेत - उद्धव ठाकरे

"प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्टीवर मत का मांडू? शासनकर्त्यांनी या गोष्टी मान्य आहेत की नाही यावर ठाम भूमिका मांडायला हवी. देवेंद्र फडणवीस त्यांना गुरुजी मानत असतील तर त्यांचे सगळेच बरोबर आहे असे म्हटलं पाहिजे. पण आपण भविष्याकडे न पाहता इतिहासाचे उगाचच उत्खनन करत चाललो आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि भविष्य मारुन टाकायचं ही पद्धत राज्याला घातक आहे. गुरुजींनी चांगले धडे विद्यार्थ्यांना द्यावेत हीच माझी अपेक्षा आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

13:03 PM

लव्ह जिहादबाबत सरकार विचार करत आहे - देवेंद्र फडणवीस

लव्ह जिहाद याबाबत इतर राज्यात काय कायदे आहेत याची नेमकी माहिती घेतली जात आहे. त्यानुसार याबाबत सरकार विचार करत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

13:00 PM

माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी कारवाई करीन - देवेंद्र फडणवीस

"त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. तुमचे नाव पृथ्वीराज बाबा आहे. बाबा कसे आले याचा पुरावा मागू का? हे मतांचे राजकारण आहे. महापुरुषांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी कारवाई करीन," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

12:44 PM

गुरुजी म्हणायला मला हरकत नाही पण पुरावा आहे का? - पृथ्वीराज चव्हाण

"अमरावतीमध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. आपण म्हणालात की महिमामंडन कुणी करु नये. पण आपण काय करताय? त्या माणसाला आपण गुरुजी म्हणताय. काही पुरावा आहे का? गुरुजी म्हणायला मला हरकत नाही. तो माणूस मी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे असे सांगतो आहे. प्राध्याप्यक होता असे सांगतो. बहुजन समाजाच्या मुलांकडून सोनं गोळा करतो. त्यांची संस्था नोंदणीकृत आहे का?," असा सवाल पृर्थ्वीराज चव्हाण यांनी केला.

12:28 PM

महापुरुषांवर कोणी वक्तव्य केले तर कारवाई होईल - देवेंद्र फडणवीस

"संभाजी भिडे यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी पाठवलेली नोटीस संभाजी भिडे यांनी स्विकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. भाषणाचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले. माध्यमांमध्ये फिरत आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरील आहेत. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनीही तक्रार दाखल केली आहे. ती अमरावती पोलिसांकडे वर्ग केली आहे. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केले तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल. संभाजी भिडे हिंदुत्वासाठी काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांच्या किल्ल्यांसोबत ते बहुजन समाजाला जोडतात. हे कार्य चांगले आहे. त्यांना महापुरुषांवर वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही. महापुरुषांवर कोणी वक्तव्य केले तर कारवाई होईल," असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

12:10 PM

वाळूच्या प्रश्नावरून बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यात कलगीतुरा 

सरकारने घोषणा केली की वाळूचे धोरण ठरवलं जाईल. साडेसहाशे रुपयाला ब्रासला वाळू पुरवली जाईल. त्याची परिस्थिती काय आहे आणि त्याबाबत काही माहिती उपलब्ध आहे का असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती आता उपलब्ध नाहीये पण राज्यातला वाळू माफियांचा उच्छाद मोडण्यासाठी अशा पद्धतीचे धोरण अवलंबलं होतं. आमचा प्रयत्न आहे की लोकांना योग्य त्या दरात वाळू मिळावी, असे म्हटलं आहे.

12:07 PM

विरोधी पक्षनेते पदी विजय वडे्टीवार यांच्या नावाची घोषणा 

विरोधी पक्षनेते पदी विजय वडे्टीवार यांच्या नावाची घोषणा आज दुपार पर्यंत होईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. आज विधान भवनच्या कामकाजात विरोधी पक्षेनेते पदाबाबतचा घोषणेबाबतच्या कामकाजाचा उल्लेख नसल्याची बाब निदर्शनास येताच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अध्यक्षांची भेट घेतली होती.

12:03 PM

हिंदुत्ववादी सरकार असताना देवदेवतांचा अपमान - अंबादास दानवे

"मागच्या दहा पंधरा दिवसात सरकार तोंड देखल्या गोष्टी करत आहेत. सरकार जनतेला कोणताही दिलासा देऊ शकलेलं नाही. आगामी काळातसुद्धा सभागृहाच्या बाहेर आंदोलन होईल. महापुरुषांचा अपमान होत असताना संभाजी भिंडेंसारखी प्रवृत्ती राष्ट्रपित्यांबाबत काही तरी बरळते. हिंदुत्ववादी सरकार असताना देवदेवतांचा अपमान होतो. सरकार यावर कारवाई करत नाही हे दुर्दैव आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी आवाज उठवेल. सरकारचे संभाजी भिंडेंना संरक्षण आहे," असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

11:48 AM

संभाजी भिडेंना अटक करा; विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

संभाजी भिंडेंना अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होतानाच विरोधकांनी ही मागणी लावून धरली आहे.

Read More