Marathi News> मुंबई
Advertisement

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांचे पद रद्द

डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांचे पद रद्द

आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतील KDMC २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अखेर त्या गावांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे,  उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे  अशी या १३ नगरसेवकांची नावे आहेत.

पालिका निवडणूक विभागाने आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल पाठवला होता. यानंतर आयुक्तांनी या १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुदत संपण्यापूर्वीच नगरसेवक पद रद्द झाल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार घेसर, हेदुटणे, भाल, उंब्रोली, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडीवली ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांची मिळून आता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होईल. कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने ती ओळखली जाईल. नगरविकास विभागाने यासाठीची प्रारूप अधिसूचना जारी केली होती. 

Read More