Marathi News> मुंबई
Advertisement

रस्त्यावरचा खड्डा चुकवताना गेला तरुणाचा जीव; सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

Kalyan Accident : कल्याणमध्ये घडलेल्या या जीवघेण्या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. खड्ड्यामुळेच तरुणाचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रस्त्यावरचा खड्डा चुकवताना गेला तरुणाचा जीव; सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : पावसाळ्यामुळे (monsoon) रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य पाहायला मिळत आहे. अशातच कल्याणमध्ये (Kalyan News) रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा जीव गेल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तोल जाऊन सिमेंट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याण मलंग रोड द्वारली परिसरात घडली आहे. तरुणाच्या धक्कादायक मृत्यून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Kalyan Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रस्त्यारील खड्डे चुकवत असताना या दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि तो सिमेंट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आला. खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. सूरज गवारी असे मयत तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व चिंचपाडा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कल्याण मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचा काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सूरज गवारी हा त्याच्या दुचाकीने या रस्त्याने जात होता. 

मात्र सूरज गवारीचा तोल गेला व तो थेट शेजारून जात असलेल्या सिमेंट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातात या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो सिमेंट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याची आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केला आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमध्ये अंतर्गत रस्त्यांवर बरेच खड्डे पडलेत. रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात आहे. खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याची माहिती केडीएमसीकडून देण्यात आली होती. खड्डे आता नागरिकांच्या जीवावर उठले असताना देखील खड्डे बुजवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Read More