Marathi News> मुंबई
Advertisement

'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला

नव्या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही.

'या' गतीने कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील; फडणवीसांचा सरकारला टोला

मुंबई: ठाकरे सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर दोन महिन्यांत १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. याच गतीने कारभार सुरु राहिला तर ३५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ४६० महिने लागतील. इतके दिवस हे सरकार तरणार आहे का? हा लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मंगळवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी फडणवीसांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. 

राज्यात निवडून आलेले सरकार जनतेमधून निवडून आलेले नाही. तडजोडीचे राजकारण करुन सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने वचनभंगाची सुरुवात शेतकऱ्यांपासून केली. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. आमचे काळजीवाहू सरकार असताना शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, नव्या सरकारने शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

'कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या...'

गेल्या निवडणुकीत आम्ही सत्तेत येण्यापूर्वी कर्जमाफीविषयी कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मात्र, तरीही शेतकऱ्यांची अडचण ओळखून आमच्या सरकारने सत्तेत असताना १९ हजार कोटीची कर्जमाफी केली. याउलट महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर ते कर्जमाफीच्या नावाखाली लोकांना मुर्ख बनवत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ठाकरे सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ६८ गावांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज असलेल्या १५,३५८ शेतकऱ्यांची नावे आहेत.

Read More