Marathi News> मुंबई
Advertisement

आर्थिक मंदीतही आयआयटीच्या विद्यार्थ्यांची चांदी

 गडेगंज पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर 

आर्थिक मंदीतही आयआयटीच्या विद्यार्थ्यांची चांदी

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : सध्या देशभरात मंदीचं वातावरण असताना, आयआयटीच्या विद्यार्थ्यांची मात्र चलती सुरू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मंदीच्या या वातावरणातही आयआयटीतील हुशार विद्यार्थ्यांना गडेगंज पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर दिली असल्याचं कळत आहे. 

उद्योग क्षेत्रात मंदी असताना आयआयटीत मात्र नोकऱ्यांची तेजी असल्याचं वातावरण आहे. मुंबई आयआयटीत कॅम्पस इंटरव्युमध्ये पहिल्याच टप्प्यात जवळपास बाराशे विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. मुंबई आयआयटीत १ डिसेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान कॅम्पस इंटरव्यु पार पडले. यामध्ये २६५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी जवळपास सव्वातेराशे विद्यार्थ्यांना तगड्या पगाराच्या नोकऱ्यांनी ऑफर दिली. 

संधोधन आणि विकास क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सरासरी २७ लाख ४२ हजारांच्या पॅकेजची ऑफर राहिली. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचीच्या विद्यार्थ्यांना २१ लाख २४ हजारांचं, आयटी आणि सॉफ्टवेअर २१ लाखाचं पॅकेज, ऍनेलिटिक्सच्या विद्यार्थ्यांना १७ लाख तर, कन्सल्टिंगच्या विद्यार्थ्यांना साडे चौदा लाख वार्षिक पगाराचं पॅकेज मिळालं. 

नोकऱ्यांच्या ऑफर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये अमेरिका, जपान, सिंगापूर सारख्या देशातील कंपन्यांचा समावेश आहे. Microsoft मायक्रोसॉफ्ट, Google गुगल, Ola ओला, Uber उबर अशा नामांकित कंपन्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे यंदा आयआयटीच्या विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून वार्षिक १ कोटी १७ लाखांच्या पगाराची सर्वात मोठी ऑफर मिळाली आहे. बाहेर मंदी असताना आयआयटीच्या विद्यार्थ्यांना जगभर मागणी असल्याचं यंदाच्या कॅम्पस इंटरव्युमधून पुन्हा सिद्ध झालं आहे. 

Read More