Marathi News> मुंबई
Advertisement

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Mumbai News : सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस का अशी वाक्ये सर्रासपणे उच्चारली जातात. त्यामुळे या वाक्यांचा उच्चार करताना कोणाचा अपमान करण्याचा हेतू नसेल तर या वाक्यांना गैरवर्तन, अपशब्द म्हणता येणार नाही, असा निर्वाळा हायकोर्टानं (Bombay High Court) दिला आहे. पतीची घटस्फोटाची (Divorce) मागणी स्वीकारताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले की मराठीतील तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस यासारख्या सामान्य उच्चारांना अपमानास्पद किंवा घाणेरडे मानले जाऊ शकत नाही.

पतीची घटस्फोटाची मागणी स्वीकारताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबीक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पतीने हायकोर्टात धाव घेतली होती. दुसरीकडे पतीने ‘तुला अक्कल नाही’,‘तू वेडी आहेस’, असे अपशब्द वापरत आपला मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप करणारी याचिका पत्नीने दाखल केली होती. यासोबत, रात्री उशीरा बाहेर फिरायला घेऊन जा असे सांगितले म्हणून आपल्यावर आरडाओरडा करत आपला मानसिक आणि शारिरीक छळ केला असा दावा पत्नीने याचिकेत  केला होता.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने सांगितले की, पक्षकार जेव्हा घरी मराठी बोलतात तेव्हा असे उच्चार सर्रास होतात आणि अपमान किंवा अपमान करण्याच्या हेतूने असे केले गेले असे दाखवल्याशिवाय ते अपमानास्पद मानले जाऊ शकत नाही. "तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस ही वाक्ये मराठी कुटुंबीयांत सर्रासपणे बोलली जातात. मराठी कुटुंबात ही वाक्ये अनेकदा उच्चारली जातात. त्यामुळे वाक्ये उच्चारताना व्यक्तीला अपमानित करण्याचा हेतू नसतो. म्हणून, या वाक्यांना गैरवर्तन किंवा अपशब्द म्हणता येणार नाही," असा निर्वाळा खंडपीठाने दिला.

न्यायालयाने यावेळी असेही नमूद केले की, पत्नीने ज्या घटनांदरम्यान पतीने असे वक्तव्य केले होते, त्या घटनांचा आधारभूत तपशील दिलेला नाही. त्यामुळे हे शब्द केवळ तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यासाठी काढल्याचे स्पष्ट होत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. घटस्फोट नाकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने केलेल्या अपीलवर हा खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं आहे.

पतीने आपल्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केले, असा पत्नीचा युक्तिवाद होता. पत्नीने आरोप केला की पती तिला "तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस" असे घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत होता. याशिवाय, तो रात्री उशिरा यायचा आणि बाहेर फिरायला जायला सांगितल्यास तिच्यावर ओरडायचा, असाही दावा पत्नीने केला होता.

दुसरीकडे पतीने दावा केला की आपल्या पत्नीचे वर्तन क्रूरतेचे होते. पत्नीने बिनबुडाचे आरोप करून त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्यालाचीही माहिती पतीने न्यायालयाला दिली. पत्नीने बिनबुडाचे आरोप करून समाजात आपली आणि कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली, असा आरोपही पतीने केला होता. यावर पत्नीने केलेले बेजबाबदार आणि खोटे निराधार आरोप आणि पुराव्यांद्वारे त्याचे समर्थन करण्यात अयशस्वी होणे हे क्रौर्यच ठरेल आणि पतीला विवाह तोडण्यास पात्र ठरेल, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. तसेच न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्वीकारला.

Read More