Marathi News> मुंबई
Advertisement

'त्या' दिवसांत काय घडलं ? गृहमंत्र्यांनी दिला लेखाजोखा

गृहमंत्र्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले

'त्या' दिवसांत काय घडलं ? गृहमंत्र्यांनी दिला लेखाजोखा

मुंबई : परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज स्वत:वरील आरोपांचे पुन्हा एकदा खंडन केले. गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर काही लोकांनी खोटे आरोप करून माध्यमातून खोट्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी व्यथित झाल्याचे देशमुखांनी ट्वीटरवर म्हटलंय. 

कोरोनाच्या संपूर्ण एक वर्षाच्या कार्यकाळात आमच्या पोलीसांचे मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ५ फेब्रुवारीला मी कोरोना बाधीत झालो. त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत मी नागपूरच्या ऍलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. १५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी खाजगी विमानाने होम क्वारंटाईनसाठी नागपूरहून लगेच मुंबईत आलो. होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो अशी माहिती देशमुख यांनी दिली. 

नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना आणि मुंबईत होम क्वारंटाईन असताना मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका आणि कार्यक्रमात सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर मी १ मार्चपासून जे अधिवेशन होतं त्याच्या कामाला लागल्याचे देशमुख म्हणाले. 

दरम्यान अधिवेशनात प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना होत्या त्याच्या ब्रिफींगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. माझ्या शासकीय कामासाठी मी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. ज्या पद्धतीने जनतेमध्ये चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करतायत त्यासाठी माहिती देत असल्याचे देशमुख यांनी म्हटलंय. 

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत चालला आहे. दरम्यान राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलीय. त्यामुळे आता या प्रकणाला कोणते वळण मिळते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Read More