Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश

Diwali 2023 : वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिवाळीत फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे. 

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! दिवाळीत धुमधडाका आता फक्त दोनच तास... कोर्टाचे कठोर आदेश

Diwali 2023 : हवामानातील बदलामुळे मुंबईत वायू प्रदूषणात (Air Pollution) प्रचंड वाढ झाली आहे,  त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना शासनानं आणि मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) हाती घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवाळीत रात्री 8 ते रात्री 10 या कालावधीतच फटाके फोडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने  (Mumbai High Court) दिले आहेत. या निर्देशांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावं, तसंच कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि  प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल  (Iqbal Singh Chahal) यांनी केलं आहे. 

आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वांना प्रिय असा दीपावली सण सुरू झाला आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा दीपोत्सव आपल्याला चांगले आणि योग्य वागण्याची शिकवण देतो.  यंदाच्या दीपावलीमध्ये मुंबईकरांकडून विशेष असे सहकार्य अपेक्षित आहे. ते म्हणजे, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, यंदाच्या दीपोत्सवात रात्री 8 ते रात्री 10 या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. शक्यतोवर, कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असं आवाहन चहल यांनी केलं आहे. 

वातावरणीय बदल, त्यासोबत बांधकामांमधून उडणारी धूळ आणि इतर कारणांनी वायू प्रदूषण वाढलं आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कार्यवाहीला फक्त शासकीय कामकाजापुरते मर्यादित न ठेवता त्याला आता लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे.  लोकचळवळीतून केलेलं कामकाज नक्कीच यशस्वी होतं. बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत. विशेषतः प्रदूषण वाढीतील मोठा घटक ठरत असलेली धूळ पसरु नये म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम देखील दिसत आहे. असे असले तरी, एकट्या महाराष्ट्र शासनाने किंवा महानगरपालिकेने प्रयत्न करून चालणार नाही. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्व नागरिकांचे सहकार्य आणि सहभागाची जोड मिळाली तर प्रदूषण निश्चितच रोखता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दीपावली सणामध्ये नागरिकांनी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी केलं आहे.

उच्च न्यायालय आणि महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचं सर्व नागरिकांनी पालन केलं तर वायू प्रदूषण टाळणं शक्य होईल. कोविड कालावधीमध्ये देखील महानगरपालिकेच्या विनंतीमुळे मुंबईकरांनी फटाके फोडणं टाळलं होतं, याची आठवण करुन देत तशाच प्रकारचे सहकार्य यंदा दिवाळी सणामध्ये करावे, अशी अपेक्षा देखील चहल यांनी व्यक्त केली आहे.

Read More