Marathi News> मुंबई
Advertisement

धक्कादायक : 'क्रिस्टल टॉवर'ला भोगवटा प्रमाणपत्रच मिळालेलं नाही

इमारतीत फायर सिस्टम अॅक्टिव्ह नव्हते...

धक्कादायक : 'क्रिस्टल टॉवर'ला भोगवटा प्रमाणपत्रच मिळालेलं नाही

मुंबई : दक्षिण मुंबईच्या परळ भागात आज सकाळी 'क्रिस्टल टॉवर' या इमारतीला लागलेल्या आगीत चौघांना आपले प्राण गमवावे लागलेत... तर २० हून अधिक जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंयच. हिंदमाता सिनेमाजवळच असलेल्या १६ मजली रहिवासी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीच्या घटनेनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आलीय... ती म्हणजे, 'क्रिस्टल टॉवर'ला अद्याप भोगवटा प्रमाणपत्रच ( ओसी- occupational certificate)मिळालेलं नाही. 

कुटुंब राहायला आलीच कशी?

त्यामुळे, ओसी मिळाला नसतानाही या इमारतीत रहिवासी कुटुंब राहायला आलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.  गेल्या पाच वर्षांपासून या इमारतीत ही कुटुंब राहत आहेत. २०१३-१४ मध्ये सुपारीवाला बिल्डर्सने ही इमारत बांधलीय. मुंबई महापालिकेच्या बिल्डींग प्रपोजल डिपार्टमेंटने २०१६ मध्ये नोटीस पाठवली होती, असंही समजतंय. 

'क्रिस्टल टॉवर' असुरक्षित घोषित

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली होती. इमारतीत फायर सिस्टम अॅक्टिव्ह नव्हते. आग लागल्यानंतर टॉवरचा फायर सिस्टम अॅक्टिव्ह करण्यात आला. प्रशासनानं हा टॉवर असुरक्षित घोषित केलाय. यासोबतच इमारतीच्या कमेटीविरुद्ध फौजदारी खटला (क्रिमिनल केस) दाखल करण्यात आलाय. 

चौघांचा मृत्यू... 

या घटनेत ६२ वर्षीय शुभदा शेळके आणि ३६ वर्षीय बबलू शेख यांचा मृत्यू झालाय... तर आणखी दोघांचा लिफ्टमध्ये मृतदेह सापडलेत. त्यामुळे एकूण चार जणांचा यात मृत्यू झाल्याचं समजतंय.  क्रेनच्या साहाय्यानं  २० जणांची या इमारतीतून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे.
 

Read More