Marathi News> मुंबई
Advertisement

मजूरांच्या मदतीला रोहयो; ४६ हजारांहून अधिकांना काम

काळजी करु नका, मागेल त्याला काम मिळेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. 

मजूरांच्या मदतीला रोहयो; ४६ हजारांहून अधिकांना काम

मुंबई :  कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. एकीकडे लॉकडाऊन असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाही अशा भागात रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये  रोजगार हमी योजनेची 46 हजार 539 कामं सुरु झाली आहेत. या कामांसाठी तब्बल 5 लाख 92 हजार 525 उपस्थित आहेत. मजुरांना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेत त्यांना कामं उपलब्ध करुन दिली जात आहेत. काळजी करु नका, मागेल त्याला काम मिळेल असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्याचीच अंमलबजावणी करत, मागेल त्याला काम देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

काम उपलब्ध करुन देण्यात तीन विभाग आघाडीवर आहेत. त्यात सर्वाधिक 36,046 कामं ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कृषी विभागाकडून 5529 कामं तर  रेशिम संचालनालयाने 1329 काम उपल्ध करुन दिली आहेत.
 अशा 19 प्रकारच्या कामांसाठी शेल्फवर जवळपास 5 लाख 87 हजार 360 कामं तयार ठेवण्यात आली आहेत. 

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी -

 मनरेगाच्या कामांवरील मजुरांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सुचनाही सांगण्यात आल्या आहेत. मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देणे, मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणं, लक्षणं आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे, अंतर ठेवून काम पूर्ण होईल याची काळजी घेणं, यांसारख्या सूचनांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्हानिहाय मजुरांची उपस्थिती

राज्यात सर्वाधिक मजूर भंडारा जिल्ह्यात आहेत. भंडाऱ्यात 1  लाख 31 हजार 118 मजुरांना काम मिळालं आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर 62 हजार 889 मजुर आहेत. गोंदिया तिसऱ्या क्रमांकावर असून 56 हजार 192 मजूर आहेत. चंद्रपूरमध्ये  49,796,  पालघरमध्ये 44,622, गडचिरोलीमध्ये 32,551, नंदूरबारमध्ये  27,191, नाशिकमध्ये 19,567, यवतमाळमध्ये 17,196, बीडमध्ये 13,132, उस्मानाबादमध्ये 11,777, जालन्यात 11,774, धुळयात 11,146, अहमदनगरमध्ये 9,917, नांदेडमध्ये 8,521, बुलढाण्यात 7,874, लातूरमध्ये 7,872, 

औरंगाबादमध्ये 7 हजार 44, नागपूरमध्ये 6 हजार 936, जळगावमध्ये 6 हजार 887, हिंगोलीत 6 हजार 835, रत्नागिरीमध्ये 4 हजार 877, परभणीमध्ये 4 हजार 367, पुण्यात 4 हजार 16, अकोला- 3 हजार 689, सोलापूरमध्ये 3 हजार 569,  वर्ध्यात 3 हजार 477, साताऱ्यात 3 हजार 353, सांगलीत 3 हजार 156, वाशिमध्ये 3 हजार 133, सिंधुदूर्गमध्ये 2 हजार 343, ठाण्यात 2 हजार 156, कोल्हापूरमध्ये 1988, रायगडमध्ये 1564 मजूर कामावर उपस्थित आहेत.

एकल जॉब कार्डधारकांना काम देतांना प्राधान्य

ज्यांना कुणाचाही आधार नाही असे लोक एकल जॉबकार्डधारकमध्ये येतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकल जॉब कार्डधारकांची संख्या  २२ लाख २६ हजार ८७८ इतकी आहे. यात एकल महिलांची संख्या ८००९१२ असून एकल पुरुषांची संख्या १४ लाख २५ हजार ९६६ आहे. त्यांना कामाच्या माध्यमातून आधार मिळावा म्हणून एकल जॉब कार्डधारकांना प्राधान्यानं कामं उपलब्ध करुन देण्याच्या सुचनाही सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

 वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टे धारक असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मनरेगाअंतर्गत नोंद करण्यात आली असून त्यांना जास्तीत जास्त कामं उपलब्ध करुन द्यावीत अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Read More