Marathi News> मुंबई
Advertisement

'मी एकनाथ संभाजी शिंदे'... बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत घेतली शपथ

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर विराजमान, मुख्यमंत्रिपदी ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसदार

'मी एकनाथ संभाजी शिंदे'... बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत घेतली शपथ

Maharashra Shinde Government : हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की..... अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राजभवनमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा पुकारला तेव्हा त्यांना देखील आपण मुख्यमंत्री होऊ, याची सूतराम कल्पना नव्हती. शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. पण आता त्यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं त्यांच्या रुपानं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवण्याचं वचन पूर्ण झालंय. 

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास
धर्मवीर आनंद दिघेंचं बोट धरून 1980 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात त्यांचं मूळ गाव. ठाण्यातील मंगला हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. 11 वी पास झालेल्या शिंदेंनी पोटापाण्यासाठी ठाण्यात ऑटोरिक्षाही चालवली. 

ऐन तरुणवयात आनंद दिघेंच्या संपर्कात शिंदे आले आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. 1984 मध्ये किसननगरचे शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी हिरीरीनं भाग घेतला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात बेल्लारीच्या तुरुंगात त्यांनी 40 दिवसांचा कारावास भोगला... 1997 साली ठाणे महापालिकेत ते पहिल्यांदा नगरसेवक झाले... 2001 मध्ये त्यांना ठाणे महापालिका सभागृह नेतेपद देण्यात आलं.

धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू
2001 मध्ये आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेचं ठाणं पोरकं झालं... आनंद दिघेंच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी शिंदेंनी बऱ्यापैकी भरून काढली. त्याची पोचपावती त्यांना आमदारकीच्या रुपानं मिळाली. 2004 साली ते पहिल्यांदा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. आणि तेव्हापासून लागोपाठ चारवेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत. 2005 मध्ये त्यांच्यावर ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

नेमकं याचवेळी नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही मनसेच्या रुपानं वेगळी चूल मांडली. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या रुपानं विश्वासू सेनापती मिळाला. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ते उद्धव ठाकरेंचा उजवा हात बनले. 

2014 मध्ये त्यांच्यावर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री बनले. सार्वजनिक आरोग्य खात्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नगरविकास मंत्री झाले. 

नगरसेवक, आमदार, ठाणे जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री अशी पदं त्यांना मिळत गेली... शिवसेनेत दुस-या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान त्यांनी मेहनतीनं पटकावलं... मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे संबंध बिघडले... राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या व्यूहरचनेतून त्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला... तब्बल 39 आमदारांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पुकारलं. आता त्या बंडाचं फळ शिंदेंना मिळालं असून, ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झालेत.

Read More