Marathi News> मुंबई
Advertisement

महाविकासआघाडीतील नाराजी समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत

महाविकासआघाडीमधील नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर.... 

महाविकासआघाडीतील नाराजी समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचं सरकार बनलं खरं, पण सरकारचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनं गाठ बांधली आहे. मात्र या संसारात पदोपदी अडचणी येत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या सरकारचं खातंवाटप व्हायला बराच कालावधी जावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची. तारीख पे तारीख करत आता अखेरीस ३० डिसेंबरचा मुहूर्त ठरला आहे. मात्र या विस्ताराआधी पुन्हा एकदा खातेवाटपावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. 

महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार सत्तेवर येऊन महिना पूर्ण झाला असला तरी तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असला तरी खातेवाटपावरून पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झालं आहे. ग्रामीण भागाशी संबंध असलेलं एकतरी खातं मिळावं, असं काँग्रेसला वाटतं आहे. खातेवाटपाच्या चर्चेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही बाब नजरेआड केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता एखादं जास्तीचं खातं पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरू असल्यानं विरोधकांच्या हाती चांगलंच कोलीत मिळालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणण्याची संधी सोडली नाही. 

काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय तोडगा काढतात याकडे लक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने १९९९ ते २०१४ या काळात सत्तेत असताना अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. आता सत्तेचं वाटप तीन पक्षात आहे. त्यामुळे सहाजिकच काही महत्त्वाची खाती या दोन पक्षांच्या हातून गेली आहेत. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत जादा खाती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे.

Read More