Marathi News> मुंबई
Advertisement

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.  

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

मुंबई : कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आता जय्यत तयारी सुरु झाली आहे. नवीन वर्षात कोरोनाची लस (Vaccine) टोचण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिके दोन जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

लसीकरणाची पूर्वतयारी राज्यात सुरू आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने तयार केलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये आत्तापर्यंत सात लाख खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती नमूद केली आहे. यात आणखी तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. 

राज्यात जवळपास दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाचे आयमुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली. कोरोना लस साठवणुकीसाठी शीतसाखळी निर्माण केली जात आहे. आरोग्य विभागाच्या मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अकोला अशा प्रमुख विभागीय केंद्रांमध्ये मोठ्या शीतपेटय़ा दाखल झाल्या आहेत. त्या बसविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लसीकरण कसे होईल याची प्रात्यक्षिके राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये घेण्यात येतील. दरम्यान, देशात पंजाब, गुजरात, आसाम आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत लसीकरणाची प्रात्यक्षिके सोमवारी आणि मंगळवारी घेण्यात येणार आहेत.

मुंबईत १७ आयएलआर दाखल

लशीच्या कुप्यांचे जतन करण्यासाठी १७ आयएलआर (आईस लीन रेफ्रिजरेटर) राज्य आरोग्य विभागाकडून मुंबई पालिकेला प्राप्त झाले आहेत. यातील दहा हे पालिका आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात बसविण्यात येणार आहेत. अन्य लसीकरण करण्यात येणाऱ्या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात लावले जातील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

Read More