Marathi News> मुंबई
Advertisement

इव्हीएमच्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर लावा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मतदानानंतर काँग्रेसने पुन्हा ईव्हीएमवर शंका घेतली आहे.

इव्हीएमच्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर लावा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : मतदानानंतर काँग्रेसने पुन्हा ईव्हीएमवर शंका घेतली आहे. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर बसवा, अशी मागणी काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे. काँग्रेससह विरोधकांनी याआधीही इव्हीएमला विरोध केला होता. काही महिन्यांपूर्वी विरोधकांनी याबाबत संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती.

'निवडणूक आयोगाने अजूनही लोकांच्या मनातल्या शंका दूर केलेल्या नाहीत. अनेकवेळा संधी होती, तसंच निवडणूक आयोगाची ही जबाबदारी होती. साताऱ्याच्या नवलेवाडीमध्ये कोणतंही बटण दाबलं तरी कमळालाच मतदान होत होतं, हे समोर आलं आहे. देशभरात कोणतंही मशीन बिघडलं असं निवडणूक अधिकारी जाहीर करतात, तेव्हा मतदान कमळालाच जात असतं,' असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मतदान झाल्यानंतर ३ दिवस निकालासाठी लागतात, अगोदर दुसऱ्याच दिवशी निकाल यायचे. त्यामुळे तिकडे जॅमर लावावे, अशी आमची मागणी असल्याचं सचिन सावंत म्हणाले आहेत. 

२१ ऑक्टोबरला राज्यभरात मतदान झाल्यानंतर आता २४ ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. मतदानानंतर समोर आलेल्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेच्या महायुतीचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Read More