Marathi News> मुंबई
Advertisement

खोटे ऐकायचे असेल तर चौकीदारच्या सभेत जा, खरे ऐकायचे असेल तर इथे या- राहुल गांधी

 एकीकडे भाजपा आणि आरएसएस आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष अशी सध्या स्थिती असल्याचे ते म्हणाले.

खोटे ऐकायचे असेल तर चौकीदारच्या सभेत जा, खरे ऐकायचे असेल तर इथे या- राहुल गांधी

मुंबई : तुम्हाला खोटे ऐकायचे असेल तर चौकीदारच्या सभेत जा आणि खरं ऐकायचं असेल तर इथे या... मन की बात ऐकायची असेल तर तिथे जा आणि काम की बात ऐकायची असेल तर इथे या असे राहुल गांधी म्हणाले. निवडणूक तोंडावर असतानाची राहुल गांधी यांची मुंबईतील ही पहिली सभा आहे. काही वेळापुर्वीच भारतात परतलेल्या एअर कमांडर अभिनंदन यांचे राहुल यांनी अभिनंदन केले. तसेच जे शहीद झाले त्यांची आठवण आपण ठेवूया असेही यावेळी सांगितले.  एकीकडे भाजपा आणि आरएसएस आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष अशी सध्या स्थिती असल्याचे ते म्हणाले. हे शहर साधंसुधं शहर नाही, हे हिंदुस्थानचे इंजिन आहे, ह्रदय आहे असे त्यांनी मुंबई बद्दल कौतूकोद्गार काढले 

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी दिलेल्या स्मार्ट सिटीच्या आश्वासनावरून त्यांना घेरले. मी 100 स्मार्ट सिटी बनवणार असे 2014 च्या निवडणूकीत मोदी म्हणाले होते. मुंबईला स्मार्ट सिटी बनवण्याची गरज नाही. मुंबई ही जगातील स्मार्ट सिटी असल्याचे ते म्हणाले. मोदी जिकडे जातील तिकडे लांबच लांब भाषण ठोकतात आणि आश्वासने देतात. शेतकरी कर्जमाफी, 15 लाख 2 कोटी रोजगार असे तोंडाला येतील ते आकडे सांगतात मात्र त्यांनी यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

fallbacks

देशातील शेतकऱ्यांना दिवसाला 17 रुपये दिले म्हणून भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते. या टाळ्या योजनेसाठी वाजवल्या गेल्या नव्हत्या तर मोदींना घाबरून वाजल्या गेल्या असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. रिलायन्सला 35 हजार कोटी दिले तेव्हा टाळ्या नाही वाजल्या. घरातील एका व्यक्तीला साडेतीन पैसे देता तेव्हा मात्र टाळ्या वाजतात हे दु:ख असल्याचे ते म्हणाले. श्रीमंतांचे साडे तीन लाख कोटीचे कर्ज माफ केले पण मुंबईतील लहान व्यापाऱ्यांचे किती कर्ज माफ केले ? धारावीतील लहान व्यापाराचे किती कर्ज माफ केले ? लाखो विद्यार्थींनी शिक्षण कर्ज घेतलं आहे, त्यांचे कर्ज चौकीदार का माफ करत नाही ? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 

नोटबंदी प्रकरणातही यावेळी राहुल गांधी यांनी हात घातला. नोटबंदीच्या काळात तुम्हाला रांगेत उभे केले. त्यावेळी अनिल अंबानी, मेहुल चौक्सी रांगेत होते का ? नव्हते. कारण बँकेच्या मागे त्यांचे काळे धन पांढरे होत होते. ते चौकीदार करत होता. त्यातून भागलं नाही मग गब्बर सिंग कर आणला असेही ते म्हणाले.  मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये मी 10 दिवसात शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. तेव्हा हिंदुस्थानला समजले काँग्रेस एखादी गोष्ट सांगते तर करून दाखवते असेही ते पुढे म्हणाले. 

मोदींना कधी मिडियासमोर जाताना पाहिलं का ? असा प्रश्न विचारत माझ्या पत्रकार मित्रांना फक्त 10 मिनिटं पंतप्रधानांनी द्यावी मग सगळं दूधाचं दूध, पाण्याचं पाणी होऊन जाईल असे राहुल गांधी म्हणाले. मला आणि मोदींना समोरासमोर मिडियासमोर डिबेटला बसवा, देश सोडून पाळायची वेळ नाही आली त्यांच्यावर तर मला विचारा, असे आव्हान त्यांनी पंतप्रधानांना केले. काँग्रेस पक्ष सत्तेवर येणार आणि सत्तेवर आल्यावर शहरातील, गावातील गरीब व्यक्तीला किमान वेतन योजना लागू करणार. आम्ही गरीबांना थेट त्यांच्या खात्यात पैसे देणार असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. भाषणाच्या शेवटी पुन्हा विंग कमांडर अभिनंदन यांचे त्यांनी देशात स्वागत केले. 

Read More