Marathi News> मुंबई
Advertisement

'चांगला अभिनेता तर घ्यायचा,' गोविंदावरुन टीका करणाऱ्या जयंत पाटलांना CM शिंदेंचं उत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

Govinda Joins Shiv Sena: अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.   

'चांगला अभिनेता तर घ्यायचा,' गोविंदावरुन टीका करणाऱ्या जयंत पाटलांना CM शिंदेंचं उत्तर, सभागृहात पिकला एकच हशा

Actor Govinda Joins Shiv Sena: अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Eknath Shinde Shiv Sena) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत नकार दिला. दरम्यान यावेळी त्यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. 

गोविंदाच्या पक्षप्रवेशावर जयंत पाटील यांनी टीका केली होती. "गोविंदाचे चित्रपट आता चालत नाहीत. त्याचे चित्रपट फ्लॉप होतात. कामाने चालणाऱ्या अभिनेत्याला घ्यायला हवं होतं," असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आलं असता, त्यांच्यापेक्षा हा चांगला कलाकार आहे ना? असा टोला लगावल्यानंतर एकच हशा पिकला. 

"कोणत्याही कलाकार, कलावंताला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फार मेहनत करावी लागते. ते फार मेहनत करत असतात. एका कलाकाराचा अपमान करणं म्हणजे चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांचा अपमान आहे. याची किंमत त्यांना निवडणुकीत मोजावी लागेल. गोविंदाच आपल्या भाषणांमध्ये याबद्दल बोलतील," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. "कलावंताचा अपमान कधी करु नये. कधी कोणाचे दिवस कधी फिरतात हे माहिती नसतं," असंही ते म्हणाले.

गोविंदाने  यावेळी मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गोविंदाने तिकीट मागितलं नसून, फक्त स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती दिली. "मी 2019 ला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटलं नव्हतं पुन्हा या क्षेत्रात येईन. पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येत आहे. मी दिलेली जबादारी इमानदारीने पार पाडीन," असं गोविंदा म्हणाला. "आता मुंबई  फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय," असं कौतुकही त्याने केलं. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, गोविंदा चित्रपटसृष्टीसाठी काम करतील. ते स्टार प्रचारक आहेत. तिकीट नको असं त्यांनी आधीच सांगितलं आहे. आम्हाला याचा फायदा होईल. त्यांचं लोक ऐकतील. लवकरच यादी जाहीर होईल. महायुती ही निवडणूक जिंकणार आहे. 

Read More