Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

मुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : उपनगरीय रेल्वे मधून दररोज लाखो सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करीत असतात.  रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा (Toilets) वापरही मुंबईकरांकडून केला जातो.  त्यामुळे सामान्य मुंबईकरांना स्वच्छ अशी स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासंदर्भात पुढाकार घेण्यास सांगितलं हों.  त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेत. 

रेल्वेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांची साफसफाई होत नाही. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. याआधी हद्दीचा वाद असल्याने स्वच्छतागृहांच्या साफसफाईचा प्रश्न कायम होता. पण आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

रेल्वेची अस्वच्छ स्वच्छतागृह
अस्वच्छ स्वच्छतागृहं, दुर्गंधीयुक्त तसंच स्वच्छतागृहांमध्ये महिला कर्मचारी नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. काही स्थानकांवरच्या स्वच्छतगृहात फ्लश होत नाही, दरवाजाला कडी नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. एका सर्वेत जवळपास 97 टक्के महिलांनी रेल्वे स्थानकातल्या स्वच्छतागृहांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वेने प्रवास करणाऱ्या केवळ 20 टक्के महिला रेल्वे स्थानकातील स्वच्छातागृहाचा वापर करतात. 21.9 टक्के महिलांनी केवळ इनर्जन्सी काळात स्वच्छतागृहाचा वापर केलाय. अनेक महिलांनी रेल्वे स्थानकांवरील शौचालयात महिला कर्मचारी नसल्याची तक्रार केलीय.

या सर्व तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर बैठक घेतली. रेल्वेकडे अपुरं मनुष्यबळ असल्याने स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात असमर्थ असल्याचं कळवलं. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देत मुंबई महापालिकेने स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही सूचित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

Read More