Marathi News> मुंबई
Advertisement

सिटीस्कॅन : नवी मुंबईतलं बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडी

रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे नवी मुंबईतलं नेहमीचंच चित्र झालंय

सिटीस्कॅन : नवी मुंबईतलं बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडी

स्वाती नाईक - कपिल राऊत, झी २४ तास, नवी मुंबई : सुनियोजित आणि त्यामुळे राहण्यासाठी आरामदायी शहर अशी नवी मुंबईची ख्याती... मात्र, आता अन्य शहरांमध्ये भेडसावणारे अनेक प्रश्न तिथंही डोकं वर काढू लागलेत. रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे नवी मुंबईतलं नेहमीचंच चित्र झालंय. बघुयात याच समस्येवरचा 'झी २४ तास'चा हा 'सिटीस्कॅन'...

नवी मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा रस्ता म्हणजे  ठाणे-बेलापूर मार्गावर दुतर्फा बेकायदेशीर वाहनं उभी केली जात आहेत. त्यामुळे या भागात अपघातांची शक्यता वाढलीय. ठाणे - बेलापूर रस्त्यावर पूर्वेला औद्योगिक वसाहत आहे आणि पश्चिमेला शहर वसवण्यात आलंय. हा रस्ता पूर्वनियोजित असल्यामुळे पुरेसा रुंद आहे. रस्ता काँक्रिटचा असल्यानं आणि जागोजागी उड्डाणपूल असल्यामुळेच वाहतुकीसाठी रस्ता बराचसा मोकळा असायचा. मात्र, अलिकडच्या काळात रस्त्यावर दुतर्फा पार्कींगमुळे या हमरस्त्यावरही वाहतूक कोंडी होऊ लागलीये. रबाळे ते कोपरखेरणेपर्यंत कंपन्यांच्या बस, ओला-उबरच्या टॅक्सी, खासगी गाड्या पार्क केलेल्या असतात. ऐरोली ते मुकुंद या टप्प्यात अवजड वाहनं उभी असतात. तुर्भे इथंही बेकायदेशीर पार्कींग केलं जातं. या परिसरात पादचारी पूल किंवा उड्डाणपूल नसल्यामुळे गेल्या सात वर्षांत १३ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. रबाळे जंक्शनला रस्ता निमुळता होत असल्यानं ऐरोलीमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. शहरातही चित्र वेगळं नाही. बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नवी मुंबईच्या पाचवीलाच पुजली आहे.

तुर्भे जंक्शनला मोठ्या प्रमाणात पादचारी रस्ता ओलांडतात. दुतर्फा पार्कींगमुळे वाहनांना जायला जागा कमी पडते. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. नागरिकांना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतोय. इथं पादचारी पूल, उड्डाणपूल बांधण्याची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण झालेली नाही. 

शहरात आणि मुख्य रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. नवी मुंबईमध्ये जे ऐन पी टी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यासारखे मोठे प्रकल्प आहेत. तिथं अवजड वाहतूक २४ तास सुरू असते. मात्र, पार्किंगची सुविधा अपुरी असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. जास्तीत जास्त पार्किंग उपलब्ध करून देणं आणि चालकांना माहितीसाठी मोबाईल ऍपसारख्या प्रणालींची मदत घेणं आवश्यक आहे. तसंच नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर केल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल, असं मत वाहतूक अभ्यासक बंडू मोरे यांनी मांडलंय.  

वाहतूक पोलिसांकडे असलेलं मनुष्यबळ हे बेकायदा पार्किंग रोखण्यासाठी अपुरं आहे. तरीही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातच अवजड वाहनं मुंबईत रात्री नऊ नंतरच सोडण्यात येतात. त्यामुळे दिवसभर ही वाहनं ऐरोली, दिघा परिसरात उभी असतात. हेदेखील वाहतूक कोंडीचं एक प्रमुख कारण आहे. पालिकेनं या वाहनांसाठी तळ उपलब्ध करून दिला तर ही समस्या सुटण्यासारखी आहे.

वाहनांची वाढती संख्या, दुतर्फा पार्किंग आणि त्यामुळे होणारी कोंडी या दुष्टचक्रामध्ये नवी मुंबई शहर अडकलंय. यावर सरकार आणि पालिकेनं एकत्रितरित्या मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा या प्लॅन्ड सिटीमध्ये काहीच प्लॅनिंगनुसार झालेलं नाही, असं म्हणावं लागेल. 

Read More