Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

चेंबूरमधील तरणतलावाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली.

मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

मुंबई : चेंबूरमधील तरणतलावाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. मुंबईकरांच्या पैशांतून बांधलेला हा जलतरण तलाव. मात्र राजकीय पक्ष श्रेयासाठी कसे उतावीळ असतात, त्याचाच प्रत्यय चेंबूरमध्ये पाहायला मिळाला.

चेंबूरमधील हा जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव. या तलावाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर हे सोमवारी सकाळी या जलतरण तलावाची पाहणी करण्यासाठी आले. हा तलाव आपणच बांधल्याचा शिवसेनेचा दावा आहे. 

तर या कामाला विलंब होत असल्याची तक्रार भाजपच्या स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावरून रविवारी रात्रीपर्यंत शिवसेना-भाजपमध्ये पोस्टरबाजी रंगली. मात्र आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये समझोता झाला. भाजपनं उद्घाटनाचा आधी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द केला. तर शिवसेनेनंही हे उद्घाटन नसून, आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा असल्याचं सांगून वादावर पडदा टाकला.

शिवसेना-भाजपमधील या श्रेयवादाच्या लढाईबाबत विचारणा केली असता, आदित्य ठाकरेंनीही त्यावर सूचक भाष्य केलं. २०१४ पासून बंद असलेला जनरल अरूणकुमार वैद्य तरणतलाव आता चार वर्षांनी चेंबूरकरांसाठी पुन्हा सुरू होतोय. त्याच्या उद्घाटनावरून निरर्थक वाद घालण्यापेक्षा तिथं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Read More