Marathi News> मुंबई
Advertisement

बड्या सेलिब्रेटींना वाचवण्यासाठी रिझवान बळीचा बकरा?

 कंगना असो की आएशा किंवा नवाजुद्दिन. या सगळ्यांना जोडणारा एक समान दुवा आहे.

बड्या सेलिब्रेटींना वाचवण्यासाठी रिझवान बळीचा बकरा?

मुंबई :  कंगना असो की आएशा किंवा नवाजुद्दिन. या सगळ्यांना जोडणारा एक समान दुवा आहे. सीडीआर प्रकरणामध्ये हा दुवा प्रकर्षानं समोर आला, रिझवान सिद्दिकी. मुंबईमधले एक प्रसिद्ध वकील. अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी याचे वकील, अशी त्यांची ओळख करून दिली जाते. सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीनला ठाणे क्राईम ब्रँचनं समन्स पाठवलं आणि त्यापाठोपाठ रिझवान यांचं नावही समोर आलं. रिझवान यांना अटकही झाली. मात्र चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचे ताशेरे ओढत उच्च न्यायालयानं रिझवान यांना सोडण्याचे आदेश दिलेत. 

नवाजुद्दीननं सीडीआर विकत घेतल्याची माहिती

सीडीआर प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडून सिद्दीकी यांच्यामार्फत नवाजुद्दीननं सीडीआर विकत घेतल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रिझवान यांना अटक केली. मात्र रिझवान एकट्या नवाजुद्दिनचे वकील आहेत, असं नव्हे... बॉलिवूडची अँग्री यंग वुमन कंगना रणौत हीदेखील रिझवान यांचीच आशिल. कंगना विरुद्ध हृतिक रोशन खटल्यामुळे रिझवान यांनीच कंगनाची बाजू न्यायालयात मांडली आहे. त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल तपासल्यानंतर कंगनासह जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशाही पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. बड्या सेलिब्रेटींना वाचवण्यासाठी रिझवान यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप रिझवान यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी केला आहे.

रिझवान यांना अटक करताना पोलिसांनी घाई केली

या प्रकरणी रिझवान यांना अटक करताना पोलिसांनी घाई केली, हे कोर्टाच्या आदेशांमुळे स्पष्टच आहे. पण बॉलिवूडचे कलाकार आपल्या जोडीदारवर किंवा मित्र-मैत्रिणीवर पाळत ठेवण्यासाठी वकिलांच्या मार्फत कॉल डेटा मिळवत असल्याचं या निमित्तानं उजेडात आलं आहे.

Read More