Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ

भ्रष्टाचाऱ्यांनी गटारीतला गाळही सोडला नाही... 

मुंबई महानगरपालिकेच्या साफ-सफाईतही 'भ्रष्टाचारा'चा गाळ

कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : मुंबईतल्या गटारीतल्या गाळ वाहतुकीत भ्रष्टाचार कसा होतो? याचा पुरावा आज आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. एकच गाडी, एकाच दिवशी, तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या तीन वेगवेगळ्या कामांवर चालवण्याचा चमत्कार कसा झाला? पाहूयात पालिकेच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणारा हा EXCLUSIVE रिपोर्ट...

मुंबईत पावसाळ्यापूर्वी मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदी अशी तीन टप्प्यांत नालेसफाई केली जाते. चार वर्षांपूर्वी याच नालेसफाईच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं. त्यामुळं नालेसफाईकडं आता सगळ्यांचंच लक्ष असतं. मात्र त्यातूनही दुर्लक्षित राहते ती रस्त्याच्या कडेच्या गटारी, नाले यांची साफसफाई...

या गटारींच्या सफाईचं टेंडर काढलं जात नाही, पण त्यातून निघणाऱ्या गाळ वाहतुकीचं टेंडर मात्र न चुकता काढलं जातं. पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांची भ्रष्ट युती यातून करोडो रुपयांचा मलिदा कशी खाते? याचा बुरखा फाडणारी अनेक कागदपत्रं 'झी २४ तास'च्या हाती लागली आहेत. एकच गाडी, एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून कंञाटदारांनी पालिकेकडून बिलं उकळलीत.

fallbacks

महापालिकेच्या एल विभागाचे २०१६-१८ चे गाळ वाहतुकीचे कंत्राट दिलेल्या एसटीसी-ईटीसी-एमएई कंपनीनं एमएच-०४ एचडी ४१४३ आणि एमएच-०४ एचडी ४१३८ या दोन गाड्या १६ आणि १९ मे २९१७ या दोन्ही दिवशी आपल्याकडं कार्यरत असल्याचं दाखवलंय. 

धक्कादायक बाब म्हणजे, याच दोन गाड्या 'महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्रा'तून कचरा वाहतूक करत असल्याचं जैन बंधू यांच्या 'ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट' कंपनीनं दाखवलंय. आता तिसरीकडं म्हणजे मिठी नदीच्या सफाईचं काम घेणाऱ्या कंत्राटदारानंही याच दोन गाड्या, त्याच दोन दिवशी आपल्याकडं गाळ वाहतूक करत असल्याचं दाखवलंय. तिन्ही कंत्राटदारांनी लॉगशीटसह वजनकाटा पुरावेही जोडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी याविरोधात रितसर तक्रार दाखल केलीय. 

असा चमत्कार बऱ्याचदा घडतो. कंत्राटदारही खाबुगिरीत एकमेकांना कशी साथ देतात, याचंच हे उदाहरण... एल वॉर्डमध्ये गाळ वाहतूक करणाऱ्या रिकाम्या गाड्यांचं वजन हे इतर दोन ठिकाणांच्या तुलनेत १ टनानं कमी दाखवले गेलंय.

एल वॉर्डात या दोन रिकाम्या गाड्यांचे वजन ९ टन दाखवलंय. परंतु मिठी नदी आणि कचरा वाहतूक कामात याच गाड्यांचं वजन सुमारे १० टन दाखवलंय. या दोन गाड्या रोज २ फेऱ्या करतात. म्हणजे रोजची ४ टनांची गाळ वाहतूक न करताच, महिन्याला ४४ हजार आणि २ वर्षात १० लाख ६२ हजार रूपये उकळण्यात आल्याचा आरोप कप्तान मलिक यांनी केलाय.  

मुळात दररोज गटारी-नाल्यांतून इतका गाळ काढलाच जात नाही. त्यामुळं त्याची वाहतूकही होत नाही. पण त्यातला मलिदा खाण्यासाठी कागदोपत्री मात्र वाहतूक दाखवली जाते. याच चोरीचा आता पर्दाफाश झालाय. 

Read More