Marathi News> मुंबई
Advertisement

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात काहीही गैर नाही- श्याम जाजू

शिवाजी महाराज हे एखादे घराणे किंवा राज्याची प्रॉपर्टी नाही. ते राष्ट्रीय मालमत्ता आहेत.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात काहीही गैर नाही- श्याम जाजू

मुंबई: भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. गोयल यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात काहीही गैर नाही. तो शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही, असे वक्तव्य भाजपचे सरचिटणीस श्याम जाजू यांनी केले आहे. त्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

यावेळी श्याम जाजू यांनी म्हटले की, या पुस्तकाच्या शीर्षकावरून विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. मात्र, लोकांनी त्यामागील भाव समजून घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांप्रमाणे शूर आहे, धडाडीने निर्णय घेणारी आहे, असे आपण म्हणतो तेव्हा तो शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही. उलट आपण त्या मोठ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या गुणवत्तेचे कौतुक करतो. त्यामुळे विनाकारण वाद उकरून काढणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे असे श्याम जाजू यांनी म्हटले. 

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी'; भाजप नेत्याच्या पुस्तकावरून शिवप्रेमी संतप्त

तसेच या मुद्द्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी आक्षेप घेतल्यास काय करणार, असा सवालही यावेळी श्याम जाजू यांना विचारण्यात आला. त्यावेळी श्याम जाजू यांनी म्हटले की, शिवाजी महाराज हे एखादे घराणे किंवा राज्याची प्रॉपर्टी नाही. ते राष्ट्रीय मालमत्ता आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांवर फक्त आमचाच हक्क आहे, असा दावा त्यांचे वंशजही करू शकत नाहीत, असे श्याम जाजू यांनी सांगितले. 

संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांचा जयजयकार करतो. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. नरेंद्र मोदी म्हणजे दैवी देणगी आहे, असे लोकांना वाटत असल्याचेही श्याम जाजू यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

Read More