Marathi News> मुंबई
Advertisement

आनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!

Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख... 

आनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!

Mumbai Trans Harbour Link (MTHL): मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचं लोकार्पण लवकरच होणार असून या नव्या सी लिंकमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर मोठ्या फरकानं कमी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सागरी सेतूवरून माध्यम प्रतिनिधींना जाण्याची मुभा देत लोकार्पणापूर्वी नागरिकांसाठी या सी लिंकची झलक सादर करण्यात आली आणि हा अनोखा आणि अतिशय महत्त्वाकांक्षी मार्ग पाहून अनेकजण भारावले. 

महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहाच्या (Mahindra and Mahindra) अध्यक्षस्थानी असणाऱ्या आणि अनेक नव्या कल्पनांना दुजोरा देत त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या (Anand Mahindra) आनंद महिंद्रा यांनीसुद्धा या सागरी सेतूची झलक पाहून कमाल प्रतिक्रिया दिली. महिंद्रा हे कायमच त्यांच्या कल्पक सोशल मीडिया पोस्टमुळं आणि कॅप्शनमुळं चर्चेत असतात. यावेळी केलेली पोस्टसुद्धा याला अपवाद ठरली नाही. 

Mumbai Trans Harbour Link (MTHL) अर्थात अटल सेतू रात्रीच्या वेळी नेमका कसा दिसतो यासंदर्भातील एक व्हिडीओ X च्या माध्यमातून शेअर करत त्यांनी यावर आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी या सागरी सेतूचा उल्लेख एका नव्या नावानं केला. हे एक असं नाव होतं, जे खऱ्या अर्थानं या सी लिंकचं सौंदर्य दुपटीनं वाढवून जात होतं. 

हेसुद्धा वाचा : तुमच्याकडे 'ही' वाहनं असतील तर, नवा मुंबई सी लिंक तुम्हाला वापरता येणार नाही

महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Mumbai Trans Harbour Link ची रात्रीच्या वेळची ही झलक. शहरं जोडण्याची क्षमता आणि अर्थव्यवस्थेला यामुळं आणखी वाव मिळणार आहे. निपुण अभियंत्यांच्या प्रचंड मेहनतीचं हे फळ आहे. या गोल्डन रिबन (Golden Ribbon) वरून जाण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे'. 

रात्रीच्या वेळी अटल सेतूवर असणारी रोषणाई, त्यामुळं पडणारा सोनेरी प्रकाश, आजुबाजूला समुद्र, खाडी परिसर असल्यामुळं अंधारात फक्त उजळून निघालेला हा सी लिंक कोणा एका सोनेरी फितीसारखाच दिसत आहे. अंधारातून निघालेली ही प्रकाशमान वाट शहराच्या सर्वांगीण विकासाला आता हाचभार लावणार आहे हेच आनंद महिंद्रा यानी त्यांच्या समर्पक कॅप्शनच्या माध्यमातून अधोरेखित केलं. त्यांनी अटल सेतूचा केलेला हा उल्लेख तुम्हाला आवडला का? 

पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण 

देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी Mumbai Trans Harbour Link (MTHL) चं लोकार्पण करण्यात येणार आहे. या सागरी सेतूशी जोडल्या गेलेल्या अनेक भागांचा विकास यामुळं सहज शक्य होणार असल्याचं आश्वासक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

तब्बल 18 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा सहा पदरी सागरी सेतू 21.5 किमी अंतराचा असून, तो मुंबईतील शिवडी येथून सुरु होऊन पुढं रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शेवापर्यंत जोडण्यात आला आहे. 16.5 किमी सेतू समुद्रावर आणि उर्वरित 5.5 किमीचा सेतू भूभागावर उभारण्यात आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे. 

Read More