Marathi News> मुंबई
Advertisement

ऑगस्टा वेस्टलँड : पत्रकार परिषदेत फडणवीसांचे सोनिया, राहुल गांधींवर थेट आरोप

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

ऑगस्टा वेस्टलँड : पत्रकार परिषदेत फडणवीसांचे सोनिया, राहुल गांधींवर थेट आरोप

मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषद घ्यावी लागलीय. ही पत्रकार परिषद यंदाची शेवटची पत्रकार परिषद ठरतेय. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत घोटाळा झाल्याचं समोर आलंय. काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी याचं उत्तर द्यावं, अशी मागणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलीय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

'व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्ससाठी तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आलं होतं. राष्ट्रपतींसह देशातील इतर महत्त्वाच्या मंडळींसाठी ही हेलिकॉप्टर वापरण्यात येणार होते. त्यातील रशियन कंपनीनं माघार घेतली. १२ हेलिकॉप्टर्ससाठी टेंडर काढण्यात आलं. परंतु, चौकशी दरम्यान या खरेदीत घोटाळा झाल्याचं समोर आलं. शेल कंपनीच्या माध्यमातून डील करुन ही लाच देण्यात आली. वायू दल आणि तत्कालीन सत्तेवर असणाऱ्या नेत्यांना लाच दिल्यानंतर हा व्यवहार पार पडला. लाचखोरांच्या यादीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख आहे. तसंच अनेक काँग्रेस नेत्यांचं नाव या घोटाळ्यात समोर येतंय' असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.

'स्विस आणि इटालियन अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ख्रिश्चन मिशेल हा या व्यवहारातील महत्वाचा दुवा होता. त्याला भारतात आणून त्याची चौकशी करण्यात आली. मिशेलनंच सोनियांचं नाव घेतलंय. त्यानंतर एपी, इटालियन लेडी, फॅमिली अशा नावांचे संदर्भ शोधले जात आहेत. त्यामुळे मिशेलचं वकीलपत्र काँग्रेसच्या नेत्याकडे दिलं गेलं. प्रत्येक घोटाळ्यामध्ये दलाली आणि एकाच कुटुंबाचं नाव का येतं? काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी यावर उत्तर द्यायला हवं', अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

जर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा या घोटाळ्याशी संबंध नव्हता तर आपला नेता वकील म्हणून नेमण्यात येऊन या प्रकरणाची माहिती का काढली जातेय? कालपर्यंत चोर चोर म्हणून ओरडणारे राहुल गांधी आता सोनियांचं नाव आल्यावर काय म्हणणार? असा प्रश्नही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही या घोटाळ्याबद्दल माहिती आहे. परंतु, सध्या त्यांच्याकडे काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याची संधी फडणवीसांनी सोडलेली नाही.

Read More