Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप

 १५ तक्रारदार असूनही पोलिसांचा गुन्हा दाखल करायला नकार

मुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबै बँकेतल्या कथित गैरव्यवहाराचे आणखी काही प्रकार उजेडात आले आहेत. सामान्य लोकांच्या नावानं कर्ज काढून तो पैसा भलत्याच खात्यांमध्ये वळवल्याची धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे. बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या मेव्हण्याच्या खात्यावर यातला बराचसा पैसा वळता झाल्याचा आरोप होतो आहे.

अंधेरीला एका खासगी कुरियर कंपनीत कुरियर बॉय म्हणून नोकरी करणारे १५ जण. गेल्या दीड दोन वर्षांपासून अन्यायाविरोधात ते दाद मागत आहेत. या सर्वांनी मुंबै बँक अध्यक्ष प्रवीण दरेकरांचे मेहुणे महेश पालांडे यांच्या मदतीनं कांदिवली ठाकूर व्हिलेज शाखेतून कर्जं काढली. पगार कमी असतानाही क्षमतेपेक्षा अधिक रकमेची म्हणजे प्रत्येकी ३ लाखांचं कर्ज अवघ्या २ दिवसांत मंजूरही झालं. परंतु त्यांच्या खात्यावरचा पैसा भलत्याच खात्यावर वळवण्यात आला.

यापैकी काही रक्कम महेश पालांडे आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावरही वळवण्यात आल्याचं झी २४ तासकडं उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट दिसतं आहे. प्रत्यक्षात पैसे मिळालेले नसताना आता कर्ज फेडण्यासाठी या १५ जणांना बँकेकडून तगादा आणि नोटीसही येत आहेत. बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनीही ४ वेळा बैठक घेऊन पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु ते त्यांनी पाळलं नसल्याचं कर्जदारांचं म्हणणं आहे.

नाबार्डच्या अहवालामध्येही या प्रकरणाचा उल्लेख मनी लाँड्रिंग असा करण्यात आला आहे. याप्रकरणी बँकेनं एका शाखाधिका-याला निलंबित केलं आहे. पण अध्यक्षांचा मेव्हणा असल्यानं पालांडेंना वाचवलं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. यामध्ये सुमारे १० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

तर अशाप्रकारे पैसा वळता झाल्याची आपणाला माहिती नाही, असं सांगत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रवीण दरेकरांनी दिलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १५ तक्रारदार असूनही याप्रकरणी कांदिवली समतानगर पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाहीत.

Read More