Marathi News> मुंबई
Advertisement

राज्यात प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडूनही आदित्य ठाकरेंना देशभरात बंदीची घाई

राज्यात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही याचा त्यांना बहुतेक विसर पडल्याचे दिसते.

राज्यात प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडूनही आदित्य ठाकरेंना देशभरात बंदीची घाई

मुंबई: महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा फज्जा उडालेला असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी देशभर प्लास्टिकबंदीची मागणी केली आहे. यासाठी कायदा तयार केला जावा, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. प्लॅस्टिकवर बंदी घालणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रासह २० राज्यांनी यापूर्वीच प्लॅस्टिकवर बंदी घातल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता आदित्य ठाकरेंनी केलेली मागणी स्वागतार्ह आहे. 

पण राज्यात प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही याचा त्यांना बहुतेक विसर पडल्याचे दिसते. शिवसेना आमदार रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी आहे. त्यांनी प्लास्टिकबंदी जाहीर केली पण या निर्णयाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. 

नितीन गडकरींना सविस्तर उत्तर देईन

मुंबई महापालिकेचे ५८ हजार कोटी बँकेत असताना मुंबई बुडते कशी, या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रश्नाला उत्तर देण्यात येईल, असं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. गडकरींनी शुक्रवारी मुंबईतल्या एका कार्यक्रमात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गडकरींना सविस्तर पत्र पाठवून लवकरच याचे उत्तर देऊ, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्य़क्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या बँकेत जवळपास ५८ हजार कोटींच्या ठेवी आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात आम्ही मुंबई पाण्यात बुडाल्याचे ऐकतो, असे सांगत गडकरी यांनी पालिकेला टोला लगावला. पालिकेने बँकेतील पैशांचा उपयोग करून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणले पाहिजे, असा पर्यायही यावेळी गडकरींनी सुचवला होता.

Read More