Marathi News> मराठवाडा
Advertisement

बाळासाहेबांनी जे करून दाखवलं, ते राज ठाकरे यांना का नाही जमलं?

अजान सुरू असताना आपले भाषण थांबवणाऱ्यांच्या यादीतलं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे...

बाळासाहेबांनी जे करून दाखवलं, ते राज ठाकरे यांना का नाही जमलं?

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८५ पासून हिंदुत्ववाद स्विकारला. १९८७ साली झालेलया विलेपार्लेची विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ !!! ही घोषणा देत ही निवडणूक जिंकली.

१९८८ च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनाप्रमुखानी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची घोषणा केली. या घोषणेचा फायदा असा झाला की महापालिकेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. त्यांनतर शिवसेनेच्या प्रत्येक प्रचारात हाच मुद्दा होता. 

१९९५ ला शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात आले. तर, २००५ च्या निवडणुकीत शिवसेनेने संभाजीनगर हा मुद्दा पुन्हा समोर आणला. 

या निवडणुकीतला हा किस्सा आहे.. 

राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीचं सरकार होतं. औरंगाबादची महानगरपालिका आपल्या ताब्यात रहावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. तर, गेली १५ वर्ष आपल्या तब्यत असलेला गड सेनेला कायम राखायचा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारात उतरले. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात त्यांची सभा आयोजित केली होती.

सभेत शिवसेनाप्रमुखांचे भाषण सुरु झालं. वाक्यागणिक टाळ्या पडत होत्या. भाषण अंतिम टप्यात आलं होतं. इतक्यात बाजूच्या मशीदीत आजान सुरु झाली. बाळासाहेब भाषण करताना थांबले. सगळ्या मैदानात सन्नाटा पसरला. काही सेकंद झाली, आजान बंद झाली, बाळासाहेबांनी पॉज घेत पुन्हा भाषण सुरु केलं.

बाळासाहेबांनी पहिलंच वाक्य टाकलं, हे! याचसाठी विचारतोय. तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर??? बस्स, त्या एका वाक्यानं बाळासाहेबांनी सभा जिंकली होती. सगळं वातावरणच फिरलं. मतदान होण्यापूर्वीच निकाल जाहीर झाला होता. औरंगाबादचे शिवसैनिक आजही त्या सभेच्या आठवणी सांगतात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, 'आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. पण, त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत”.

आता दुसरा किस्सा राज ठाकरे यांचा

राज ठाकरे यांची औरंगाबादची सभा सुरू झाली. ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानात 'राज गर्जना' झाली. परिस्थिती तीच, शेवटाकडे आलेले भाषण आणि आजान सुरू झाली.

मात्र, आजान सुरु झाल्यावर राज ठाकरे थांबले नाही तर ते संतापले. त्यांनी पोलीसांनाच आजान थांबवण्याच्या सुचना केल्या. ते ऐकत नसतील तर आजान देणाऱ्यांच्या तोंडात बोळा कोंबा असं म्हटलं. पोलीसांनी आत्ताच सांगाव नाही तर महाराष्ट्राच्या मनगटात किती ताकद आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

आजान सुरू झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपली भाषणे थांबवल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. मात्र, राज ठाकरेंनी आजान सुरू झाल्यानंतर पोलीसांना आजान थांबवण्याची सुचना केली व आपले भाषण कायम ठेवलं.

यावरूनच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. 'राज ठाकरे यांना दुरूनच ईद मुबारक. आम्ही इफ्तार पार्टीला बोलवून मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र ते त्या लायकीचे नाहीत हे त्यांनी त्यांच्या भाषणात दाखवून दिले.' असा टोला लगावलाय.

Read More