Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका महिलेची अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृत महिलेचे शवविच्छेदन केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळच्या जामनकरनगरमध्ये विवाहितेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे अंत्यविधीसाठी तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मात्र पोलिसांना विवाहितेच्या मृत्यूची तक्रार मिळताच चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याचे तपासातून समोर आलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे.

दीपाली मिश्रा (28 रा. जामनकरनगर, यवतमाळ) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन मिश्रा (34) असे मारेकरी पतीचे नाव आहे. आरोपी महेश हा दिपालीचा दुसरा पती आहे. दोघांना दोन मुले आहे. महेशने गुरुवारी दीपालीचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या आत्याला फोन करून दिली. दीपाली हिची वारज येथील मैत्रिण अश्विनीच्या फोनवरून ही माहिती देण्यात आली होती. दिपालीच्या मृत्यूची मिळताच आत्या तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी आत्याने दीपालीच्या मृत्यूबाबत महेशकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने दीपालीच्या छातीत दुखत होते, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मात्र दीपालीच्या आत्याला महेशच्या बोलण्यावर संशय आला. त्याचवेळी महेशची मावशी चंदा तिवारी, पुष्पा चौधरी या दोघींनी सुद्धा दीपालीच्या मृत्यूबाबत महेशला विचारले असता तसेच उत्तर दिले. त्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरु झाली.
मृत दिपालीला शेवटची आंघोळ घालत असताना तिच्या गळ्यावर आणि कपाळावर काळ्या खुणा दिसल्या. त्यामुळे पुन्हा महेशला याबाबत विचारणा केली असता त्याने दीपाली बाजीवरून खाली पडली होती, असे सांगितले. पण तिच्या गळ्याभोवती आवळल्यासारख्या खुणा दिसल्याने नातेवाईकांना संशय आला.

त्यानंतर नातेवाईकांनी महेशकडे चौकशी सुरु केली. त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी रात्री दीड वाजता त्यांचे भांडण झाले होते, मोठमोठ्याने आवाज येत होता असे सांगितले. नातेवाईकांनी मुलांना विचारले असता त्यांनी मम्मी व पप्पाचा वाद झाला होता, सांगितले. त्यानंतर गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दीपालीचा अंत्यविधी करण्यासाठी अंत्ययात्रा काढण्यात आली. मात्र याचवेळी पोलिसांना याची माहिती मिळाली आणि मृत दीपाली मिश्राच्या संशयास्पद मृत्यूबाबत तक्रार नोंदविण्यात आली.

तक्रार प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बाजोरियानगरात दीपालीच्या अंत्ययात्रेला थांबवून परत तिच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशीरा दीपाला शवविच्छेदन अहवाल आला असता धक्कादायक माहिती समोर आली. दीपालीची गळा आवळून हत्या झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांकडे दीपालीच्या आत्याने महेशविरुद्ध तक्रार दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

Read More